IND vs PAK : शेलारांनी झापला, नक्वी झुकला, ACC च्या हाय व्होल्टेज मीटिंगमध्ये तुफान राडा
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाने मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी घ्यायला नकार दिला, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
मुंबई : आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाने मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी घ्यायला नकार दिला, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी घ्यायला नकार दिल्यानंतर नक्वी आशिया कपची ट्रॉफी घेऊन मैदानातून निघून गेला. यानंतर मंगळवारी दुपारी दुबई येथे आशियाई क्रिकेट परिषदेची (एसीसी) बैठक पार पडली. या बैठकीत ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंच्या मेडलबद्दलचा निर्णय एसीसीच्या टेस्ट खेळणाऱ्या पाच सदस्य देशांवर सोपावण्यात आला आहे.
बैठकीमध्ये राडा
एसीसीच्या या बैठकीत भारताकडून आशिष शेलार आणि राजीव शुक्ला यांनी प्रतिनिधीत्व केलं. आशिष शेलार आणि राजीव शुक्ला यांची या बैठकीमध्ये पीसीबी तसंच एसीसीचा अध्यक्ष मोहसिन नक्वीसोबत गाठ पडली. रविवारी रात्री पीसीबी प्रमुख ट्रॉफी घेऊन गेले, यावर ठराव व्हावा, असा आग्रह शेलार आणि शुक्ला यांनी या बैठकीमध्ये धरला. यानंतर एसीसीचे टेस्ट खेळणारे पाच सदस्य, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश बैठक घेऊन तोडगा काढतील, असा निर्णय घेण्यात आला.
advertisement
दुसरीकडे बीसीसीआयने ट्रॉफीचा हा वाद आयसीसीकडे नेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण तरीही यावर तोडगा काढण्यासाठी पीसीबी, बीसीसीआय, बांगलादेश क्रिकेट बोर्ड, श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्या सदस्यांमध्ये औपचारिक बैठक होणार आहे.
मोहसिन नक्वी झुकला
एसीसीच्या या बैठकीच्या सुरूवातीला अध्यक्ष म्हणून मोहसिन नक्वीने भाषण केलं, यात त्याने मंगोलियाचे सदस्यत्व मिळाल्याबद्दल तसंच नेपाळचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केलं. यावर आशिष शेलारांनी आक्षेप घेतला. आशिया कप जिंकल्याबद्दल भारताचेही अभिनंदन करावे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. आशिष शेलार यांनी ही मागणी लावून धरल्यानंतर अखेर मोहसिन नक्वीला झुकावं लागलं, यानंतर त्याने भारतीय टीमचे अभिनंदन केलं.
advertisement
आशिष शेलार यांनी त्यानंतर बैठकीवर बहिष्कार टाकला आणि ते बैठकीतून बाहेर पडले, यानंतर ते बैठकीत ऑनलाइन सहभागी झाले आणि मग एसीसीच्या पाच पूर्ण सदस्यांनी ट्रॉफीचा मुद्दा सोडवण्याचा निर्णय घेतला. या बैठकीच्या अजेंड्यावर उपाध्यक्षांची निवड तसंच उदयोन्मुख खेळाडू, 19 वर्षांखालील स्पर्धा यासारख्या एसीसीच्या स्पर्धांचे वेळापत्रक अंतिम करणे, हेदेखील विषय होते, पण ट्रॉफीवरून झालेल्या वादामुळे इतर कोणतेच विषय चर्चेत घेतले गेले नाहीत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2025 11:22 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : शेलारांनी झापला, नक्वी झुकला, ACC च्या हाय व्होल्टेज मीटिंगमध्ये तुफान राडा