धक्कादायक! भारतीय क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू, बॅटिंगनंतर जागेवरच कोसळला
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
क्रिकेट मॅच सुरू असतानाच बॅटिंग केल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. स्थानिक क्रिकेट मॅचवेळी हा क्रिकेटपटू जागेवरच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : क्रिकेट मॅच सुरू असतानाच बॅटिंग केल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. स्थानिक क्रिकेट मॅचवेळी हा क्रिकेटपटू जागेवरच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. मिझोरमचा माजी रणजी क्रिकेटपटू के. लालरेमरुआता याचं गुरूवारी हृदयविकाराच्या झटक्य़ाने निधन झालं आहे. मिझोरमच्या ऐझॉलजवळील मावबोक येथील रहिवासी असलेला 38 वर्षीय लालरेमरुआता हा दुसऱ्या विभागीय स्पर्धेत वैनगुई रेडर्स क्रिकेट क्लबकडून खेळत होता, तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झाले.
मिझोरम क्रिकेट असोसिएशनने लालरेमरुआता याच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. लालरेमरुआता रणजी ट्रॉफीमध्ये मिझोरमकडून दोन सामने खेळला, तसंच त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 7 वेळा मिझोरमचं प्रतिनिधित्व केलं. याशिवाय तो स्थानिक पातळीवर अनेक क्लबकडूनही खेळला. 'आमच्या संवदेना लालरेमरुआता याच्या कुटुंबासोबत आहेत. देव त्यांना या कठीण काळात सावरण्याची शक्ती देवो', असं मिझोरम क्रिकेट असोसिएशनने एका निवेदनात म्हटले आहे.
advertisement
मिझोरमचे क्रीडा आणि युवा सेवा मंत्री लालघिंगलोवा हमार यांनीही लालरेमरुआता याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, लालरेमरुआता याला सामन्यादरम्यान श्वास घेण्यास त्रास झाला आणि त्याचे निधन झाले. 'आज क्रिकेट सामन्यादरम्यान कोसळलेल्या के. लालरेमरुआता याच्या दुःखद निधनाने मला खूप दुःख झाले आहे. या कठीण काळात त्याच्या कुटुंबियांसोबत, मित्रांसोबत आणि क्रीडा क्षेत्रातील सदस्यांसोबत माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत," असे हमार म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 11:32 PM IST











