IPL 2024 : धोनीने का सोडलं कर्णधारपद? जडेजाला वगळून ऋतुराज गायकवाडलाच का दिली संधी?
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
धोनीने कर्णधारपद नेमकं का सोडलं? तसेच रवींद्र जडेजाला वगळून युवा क्रिकेटर असलेल्या ऋतुराजकडे चेन्नई सुपरकिंग्सच नेतृत्व का सोपवलं याबाबत फॅन्समध्ये चर्चा सुरु झाली आहे.
मुंबई : आयपीएल 2024 सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना चेन्नई सुपरकिंग्सने कर्णधार बदलण्याविषयी मोठी घोषणा केली आहे. एम एस धोनीने चेन्नई सुपरकिंग्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून आता मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडे सीएसकेचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. चेन्नई सुपरकिंग्सने त्यांच्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करून अधिकृत माहिती दिली. यानंतर धोनीने कर्णधारपद नेमकं का सोडलं? तसेच रवींद्र जडेजाला वगळून युवा क्रिकेटर असलेल्या ऋतुराजकडे चेन्नई सुपरकिंग्सच नेतृत्व का सोपवलं याबाबत फॅन्समध्ये मोठी चर्चा सुरु झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच एम एस धोनीने फेसबुकवर आयपीएल 2024 बाबत केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली होती. यावेळी धोनीने फेसबुकवर पोस्ट करताना म्हटलं की, नवा हंगाम आणि नव्या रोलची खूपच उत्सुकता लागून राहिलीय. त्यावेळी धोनी नेमका कोणत्या नव्या रोलमध्ये दिसणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. 22 मार्च रोजी आयपीएल 2024 चा उदघाटन सामना हा चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडणार आहे. तेव्हा उदघाटन सामन्याला एक दिवस शिल्लक असताना धोनीने सीएसकेच्या कर्णधारपदाचा राजीनामा देऊन नेतृत्व युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं आहे.
advertisement
OFFICIAL STATEMENT: MS Dhoni hands over captaincy to Ruturaj Gaikwad. #WhistlePodu #Yellove
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 21, 2024
मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड हा 2019 पासून आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळत आहे. त्याने आयपीएलमध्ये 52 सामने हे चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळले असून गेल्यावर्षी आयपीएल 2023 मध्ये त्याने 16 सामन्यात तब्बल 590 धावा केल्या होत्या. ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवल्यावर धोनी यंदा आयपीएलमधून निवृत्त होणार असल्याच्या चर्चा क्रिकेट विश्वात सुरु झाल्या आहेत.
advertisement
धोनीने का सोडलं कर्णधारपद?
चेन्नई सुपरकिंग्सच कर्णधारपद सोडण्यामागे धोनीच वय हे प्रमुख कारण असू शकतं. एम एस धोनी सध्या 42 वर्षाचा आहे. धोनीने 15 ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत आहे. मागील वर्षी गुडघ्याला दुखापत झालेली असताना देखील धोनीने चेन्नई सुपरकिंग्सचे नेतृत्व केलं आणि चांगला परफॉर्मन्स देखील दिला. तसेच त्याच्या नेतृत्वात सीएसकेने विजेतेपद देखील जिंकले. परंतु आता धोनी हा निवृत्ती घेण्यापूर्वी सीएसकेचं नेतृत्व करण्यासाठी प्रभळ खेळाडू तयार करू इच्छितो आणि म्हणूनच त्याने कर्णधारपद सोडून ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्व सोपवलं असल्याची चर्चा आहे.
advertisement
जडेजाला वगळून ऋतुराज गायकवाडकडे का दिल नेतृत्व ?
धोनीच्या निवृत्तीनंतर चेन्नई सुपरकिंग्सचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजा हा कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. आयपीएल 2022 मध्ये देखील धोनीने कर्णधारपद जडेजाकडेच सोपवले होते. परंतु त्यावेळी जडेजाच्या नेतृत्वात टीमचा परफॉर्मन्स चांगला नसल्याने स्पर्धा सुरु असतानाच जडेजाकडून कर्णधारपद काढून घेत ते पुन्हा धोनीकडे सोपवण्यात आले होते. भविष्याचा विचार करता तसेच ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवण्यामागे वय हे देखील एक प्रमुख कारण असू शकते. रवींद्र जडेजा सध्या 35 वर्षाचा असून तो अधिकतर पुढील 3 वर्ष नेतृत्व करू शकतो, परंतु ऋतुराज गायकवाड हा केवळ 27 वर्षाचा असल्याने तो पुढील जवळपास 10 वर्ष सीएसकेचं नेतृत्व करू शकतो. तेव्हा भविष्याचा विचार करून चेन्नई सुपरकिंग्सने ऋतुराज गायकवाडकडे संघाचे कर्णधारपद सोपवले असल्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 21, 2024 5:22 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2024 : धोनीने का सोडलं कर्णधारपद? जडेजाला वगळून ऋतुराज गायकवाडलाच का दिली संधी?