Smriti Mandhana : 'स्मृतीची साथ सोडणार नाही...', जेमिमा मॅचसाठी मैदानात उतरली नाही, मैत्रिणीसाठी ठाम उभी राहिली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं रविवार 23 नोव्हेंबरला होणारं लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे, यानंतर स्मृतीची मैत्रिण जेमिमा रॉड्रिग्जने मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं रविवार 23 नोव्हेंबरला होणारं लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. लग्नाच्या दिवशीच स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे लग्न पुढे ढकललं गेल्याचं दोन्ही बाजूच्या कुटुंबाकडून सांगण्यात आलं आहे, पण सोशल मीडियावर मात्र उलटसुलट चर्चा सुरू आहेत. स्मृती आणि तिच्या टीम इंडियातल्या मैत्रिणींनी लग्नासंबंधी सगळे फोटो सोशल मीडियावरून हटवले आहेत, त्यातच आता स्मृतीची खास मैत्रिण आणि टीम इंडियाची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्जने मोठा निर्णय घेतला आहे.
स्मृती मानधनाच्या कुटुंबात अचानक आलेल्या अडचणींमुळे जेमिमाने हंगामाच्या मध्यातच महिला बिग बॅश लीग (WBBL) सोडण्याचा आणि भारतामध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. मैत्री ही खेळापेक्षा महत्त्वाची असल्याचं जेमिमाने तिच्या या निर्णयातून दाखवून दिलं आहे.
जेमिमा महिला बिग बॅश लीगमध्ये ज्या टीमकडून खेळते त्या ब्रिस्बेन हिटने जेमिमा या हंगामात परतणार नाही, याची पुष्टी केली आहे. जेमिमाने ब्रिस्बेन हिटच्या मॅनेजमेंटकडे भारतामध्येच राहण्याची परवानगी मागितली होती. फ्रँचायझीने जेमिमाची ही विनंती मान्य केली आहे. जेमिमाची मैत्रिण आणि सहकारी खेळाडू स्मृती मानधनाचं लग्न पुढे ढकललं गेल्यानंतर जेमिमाने हा निर्णय घेतला आहे.
advertisement
डब्ल्यूबीबीएलमध्ये होबार्ट हरिकेन्सविरुद्धच्या सामन्यानंतर स्मृतीच्या लग्नासाठी जेमिमा भारतात परतली होती, पण स्मृतीचे वडील अचानक आजारी पडल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आलं. यानंतर, जेमिमाने स्मृतीसोबत राहण्यासाठी बिग बॅश लीगमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला.
ब्रिस्बेन हीटने एका निवेदनात म्हटले आहे की ते जेमिमाच्या निर्णयाचा पूर्णपणे आदर करतात आणि खेळाडूंचे हित ही त्यांची प्राथमिकता आहे. फ्रँचायझीचे सीईओ टेरी स्वेन्सन म्हणाले, "जेमिमासाठी हा एक आव्हानात्मक काळ आहे. जरी ती यापुढे WBBL मध्ये सहभागी होऊ शकणार नसली तरी, आम्ही तिच्या भारतात राहण्याच्या निर्णयाचे समर्थन करतो. हीट संघ तिला आणि स्मृती मानधनाच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो. जेमिमाने या हंगामात परत येऊ शकणार नाही याबद्दल निराशा व्यक्त करून टीमला मेसेज पाठवला आहे.'
advertisement
ब्रिस्बेन हिट अजूनही या मोसमातील पहिल्या विजयाच्या शोधात आहे. मागच्या सामन्यात ब्रिस्बेनचा ऍडलेड स्ट्रायकर्सकडून शेवटच्या बॉलवर पराभव झाला होता, त्यांचा पुढचा सामना शुक्रवारी ऍडलेडमध्ये सिडनी सिक्सर्सविरुद्ध होणार आहे. ब्रिस्बेनने या सामन्यासाठी टीममध्ये बदल केला आहे. वर्क लोड मॅनेजमेंटनंतर ऑलराऊंडर ग्रेस हॅरिसचं टीममध्ये कमबॅक झालं आहे. ग्रेस हॅरिस टीममध्ये लिली बॅसिंगथवेटची जागा घेईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2025 5:36 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : 'स्मृतीची साथ सोडणार नाही...', जेमिमा मॅचसाठी मैदानात उतरली नाही, मैत्रिणीसाठी ठाम उभी राहिली!


