Israel Iran Conflict : 'तेहरान थरथर कापेल...', इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यावर इस्रायलने दिली धमकी
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Israel Iran Conflict : मंगळवारीही इराण आणि इस्रायलने एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. इराणच्या हल्ल्याने संतप्त झालेल्या इस्रायलच्या अर्थमंत्र्यांनी आता तेहरान थरथर कापेल असा धडा शिकवणार असल्याचा इशारा दिला आहे.
नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी जाहीर केली असली तरी दोन्ही देशांमधील आक्रमक पवित्रा संपण्याची चिन्हे नाहीत. शस्त्रसंधी जाहीर होत असताना इराणने इस्रायलवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ला केला. मंगळवारीही इराण आणि इस्रायलने एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. इराणच्या हल्ल्याने संतप्त झालेल्या इस्रायलच्या अर्थमंत्र्यांनी आता तेहरान थरथर कापेल असा धडा शिकवणार असल्याचा इशारा दिला आहे.
इस्रायली माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इराणने युद्धबंदीचे उल्लंघन केले आणि क्षेपणास्त्र हल्ले केले, त्यानंतर उत्तर आणि दक्षिण इस्रायलमध्ये हल्ल्याचे सायरन ऐकू आले. इराणने केलेल्या इस्रायलच्या बियर शेबा आणि नेवाटिम तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात बियर शेबा येथील एक इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. यामध्ये किमान 13 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, इस्रायली अधिकाऱ्यांनी 4 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांच्या मते, या क्षेपणास्त्र हल्ल्यात 7 जण जखमी झाले आहेत, तर काही जण बेपत्ता आहेत.
advertisement
तेहरान थरथर कापेल....
इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने संताप व्यक्त केला. इस्रायलचे या हल्ल्यात चांगलेच नुकसान झाले आहे. इराणला चांगलीच अद्दल घडेल असा धडा शिकवणार असल्याचे इस्रायली सरकारने म्हटले आहे. इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने एअर डिफेन्स सिस्टिम सुरू केली आहे. इस्रायलने हल्ला केल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इस्रायल आणि इराण या देशांमध्ये मागील 12 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. इस्रायलने इराण अणुसंशोधन केंद्रावर हल्ला करून या युद्धाची सुरुवात केली होती. त्यानंतर इराणने इस्रायलला प्रत्युत्तर दिले. तर, अमेरिकेनेदेखील यात एन्ट्री घेत इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ले केले. मागील 12 दिवसांपासून मध्यपूर्व आशियाला युद्धाची झळ लागत आहे. अमेरिकेने शस्त्रसंधीची घोषणा केली असली तरी यावरून गोंधळाची स्थिती आहे.
Location :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
June 24, 2025 2:24 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Israel Iran Conflict : 'तेहरान थरथर कापेल...', इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यावर इस्रायलने दिली धमकी