वजन 285 किलो, उंची 2 फूट 8 इंच, बुटक्या राधाची झाली गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
त्रिंबक दाजी बोराटे यांच्या गोठ्यातील राधा नावाची बुटकी म्हैस थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डपर्यंत झेपावली आहे.
सातारा: साताऱ्याच्या दुष्काळी माण तालुक्यातील एका छोट्याशा गावातून आता जगभरात कौतुकाचे बोल ऐकू येत आहेत. मलवडी (ता. माण) येथील त्रिंबक दाजी बोराटे यांच्या गोठ्यातील राधा नावाची बुटकी म्हैस थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डपर्यंत झेपावली आहे. केवळ दोन फूट आठ इंच (89.8 सेमी) उंची असलेली ही मुऱ्हा संकरित म्हैस आता जगातील सर्वात बुटकी पाळीव म्हैस म्हणून नोंदली गेली आहे.
जन्म आणि वेगळेपणाची चाहूल
19 जून 2022 रोजी बोराटे यांच्या गोठ्यात राधाचा जन्म झाला. सुरुवातीला ती इतर म्हशींसारखीच वाढेल असे वाटले. परंतु दोन वर्षांनंतर तिची उंची वाढणे थांबले हे बोराटे यांचे कृषी पदवीधर पुत्र अनिकेत बोराटे यांच्या लक्षात आले. अनिकेत यांनी राधाला सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात प्रथमच नेले आणि तिथूनच तिच्या प्रसिद्धीचा प्रवास सुरू झाला. राधाचे छोटेसे काठीमान पाहून लोक थक्क झाले आणि माण तालुक्यातील ही म्हैस चर्चेचा विषय ठरली.
advertisement
माणच्या राधेने गिनीजपर्यंत झेप मारली
अनिकेत यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद थोरात यांच्या मदतीने राधासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठीची सर्व कागदपत्रे तयार केली. दीर्घ प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 28 ऑक्टोबर 2025 रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने अधिकृत मान्यता दिली. त्याचबरोबर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही राधाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
advertisement
राधाची वैशिष्ट्ये नाव:
राधा (मुऱ्हा संकरित) वय: 3 वर्षे 6 महिने उंची: 2 फूट 8 इंच (89. 8 सेमी)
वजन: 285 किलो
मालक: त्रिंबक दाजी बोराटे, मलवडी (ता. माण)
आहार: मका, कडवळ, मेथी गवत, हत्ती गवत खुराक: शेंगदाणा पेंड, मका भुस्सा
डॉ. शरद थोरात यांचे स्पष्टीकरण राधामध्ये उंची नियंत्रित करणारे जनुके विकसित न झाल्यामुळे तिची वाढ थांबली. तिच्या आईची उंची सामान्य होती, परंतु राधा ही नैसर्गिकरित्या बुटकी राहिली, असे डॉ. थोरात यांनी सांगितले. आज राधा फक्त माण तालुक्याचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान बनली आहे. दुष्काळी भागातून जगाच्या नकाशावर झेप घेणारी ही बुटकी म्हैस म्हणजे लहानशी पण भन्नाट कामगिरी याचं उत्तम उदाहरण ठरली आहे.
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
November 10, 2025 10:12 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
वजन 285 किलो, उंची 2 फूट 8 इंच, बुटक्या राधाची झाली गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद


