Success Story : शिक्षण घेत असताना केली शेती, कांदा शेतीचा प्रवीणचा प्रयोग यशस्वी, वर्षाला 4 लाख नफा
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
प्रवीण पवार याने शिक्षण घेत असतानाच शेतीतून उल्लेखनीय यश मिळवून दाखवले आहे. ग्रामीण भागातील तरुणांसाठी त्याचा हा प्रयोग प्रेरणादायी ठरत असून शेतीतूनही आर्थिक स्थैर्य मिळू शकते, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे.
बीड : बीड जिल्ह्यातील नित्रुड गावचा तरुण प्रवीण पवार याने शिक्षण घेत असतानाच शेतीतून उल्लेखनीय यश मिळवून दाखवले आहे. सध्या कृषी विषयक पदवीचे शिक्षण घेत असलेला प्रवीण पवार अवघ्या दीड एकर क्षेत्रामध्ये कांदा लागवड करून एकाच हंगामात प्रतिवर्षी साडेतीन ते चार लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा कमावत आहे. ग्रामीण भागातील तरुणांसाठी त्याचा हा प्रयोग प्रेरणादायी ठरत असून शेतीतूनही आर्थिक स्थैर्य मिळू शकते, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे.
प्रवीण पवार यांचे आई-वडील हे ऊसतोड कामगार असून उदरनिर्वाहासाठी दरवर्षी ऊस तोडीसाठी स्थलांतर करतात. अशा परिस्थितीत घरची जबाबदारी, शिक्षण आणि शेती यांचा समतोल साधत प्रवीणने शेतीकडे शास्त्रीय दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली. आर्थिक अडचणी असूनही शिक्षण अर्धवट न सोडता, मिळणाऱ्या कृषी ज्ञानाचा प्रत्यक्ष शेतीत उपयोग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यातूनच कांदा लागवडीचा हा यशस्वी प्रयोग आकाराला आला.
advertisement
कांदा पिकाच्या निवडीपासून ते लागवड, खत व्यवस्थापन, पाणी नियोजन आणि कीड-रोग नियंत्रणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर प्रवीण पवार यांनी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला. सुधारित वाणांची निवड, योग्य अंतरावर लागवड, ठिबक सिंचनाचा वापर आणि बाजारभावाचा अभ्यास करून विक्रीची योग्य वेळ साधल्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला आणि नफा वाढला. कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न कसे मिळवता येते, याचा आदर्श नमुना त्यांनी उभा केला आहे.
advertisement
शिक्षण घेत असतानाच घरचा कारभार सांभाळणे हे सोपे काम नसते. मात्र प्रवीण पवार यांनी हे आव्हान स्वीकारले. आई-वडील ऊसतोडीसाठी बाहेर असताना घरची जबाबदारी, शेतीची कामे आणि अभ्यास यांचा ताळमेळ साधत त्यांनी सातत्य ठेवले. कठोर परिश्रम, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच हे यश मिळाल्याचे ते सांगतात.
जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर कोणतीही अडचण आड येत नाही. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले, तर ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील अनेक तरुण शेतीकडे नव्या दृष्टीने पाहू लागले असून प्रवीण पवार आज ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Dec 16, 2025 4:33 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : शिक्षण घेत असताना केली शेती, कांदा शेतीचा प्रवीणचा प्रयोग यशस्वी, वर्षाला 4 लाख नफा








