यंदा सोयाबीनला अच्छे दिन येणार? पावसानं मोठं नुकसान, सोपाकडून अहवाल प्रसिद्ध
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Soybean Bajar Bhav : यंदाच्या हंगामात देशातील सोयाबीन उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई : यंदाच्या हंगामात देशातील सोयाबीन उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशात लागवड क्षेत्र कमी झाले आणि त्यात पावसाचा दणका बसल्याने, एकूण उत्पादन १७ टक्क्यांनी घटून १०५ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सोपा) यांनी वर्तविला आहे. मात्र व्यापारी संस्था आणि कृषी तज्ज्ञांच्या मते, प्रत्यक्ष उत्पादन केवळ ९५ ते ९९ लाख टनांदरम्यान राहू शकते.
लागवड क्षेत्रात घट आणि उत्पादकतेत घसरण
सोपाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, यंदा देशात ११४ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे, तर मागील वर्षी हे क्षेत्र ११८ लाख हेक्टर इतके होते. यंदा लागवडीत घट होण्याबरोबरच, हेक्टरी उत्पादकतेतही लक्षणीय घट झाली आहे. सोपाच्या मते, या वर्षी प्रति हेक्टर उत्पादकता ९२० किलो (९.२० क्विंटल) इतकी राहणार आहे, तर गेल्या वर्षी ती १०.६३ क्विंटल प्रति हेक्टर होती. त्यामुळे यंदा देशातील एकूण उत्पादन १०५ लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे, जे मागील हंगामातील १२६ लाख टनांपेक्षा तब्बल १७ टक्के कमी आहे.
advertisement
राजस्थानात सर्वाधिक नुकसान
पावसाची अनियमितता आणि कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे या वर्षी उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यातही राजस्थानमधील सोयाबीन उत्पादन जवळपास निम्म्याने घटले असल्याचे सोपाने नमूद केले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये यलो मोझॅक रोगाच्या फैलावामुळे पीक नष्ट झाले. याशिवाय, अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली आणि उत्पादनात मोठी घसरण झाली.
महाराष्ट्रातही पावसाचा फटका
महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील सोयाबीन उत्पादक भागांतही पावसाचा मोठा दणका बसला आहे. या भागांत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काही ठिकाणी शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे हातचे गेले आहे. सोपाच्या प्राथमिक अहवालात महाराष्ट्रातील नुकसानीचे पूर्ण चित्र नसले तरी, अंतिम आकडेवारी जाहीर झाल्यानंतर उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
मध्य प्रदेश सरकारची भावांतर योजना
सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने भावांतर योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार बाजारभाव आणि हमीभावातील फरक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, परंतु तज्ज्ञांच्या मते, ही योजना केवळ एका राज्यापुरती मर्यादित असल्याने महाराष्ट्र, राजस्थान आणि इतर राज्यांतील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही.
advertisement
बाजारावर परिणाम
भावांतर योजनेमुळे शेतकरी गरजेनुसार सोयाबीन विकू शकतील, परंतु त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, सोयाबीनचे दर काही काळ स्थिर राहतील किंवा घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उत्पादन १०० लाख टनांखाली जाण्याची शक्यता
view commentsसोपाच्या मते उत्पादन १०५ लाख टनांवर राहील, मात्र व्यापारी संस्था आणि बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की देशातील प्रत्यक्ष सोयाबीन उत्पादन १०० लाख टनांपेक्षा कमी, म्हणजेच ९५ ते ९९ लाख टनांच्या दरम्यान राहण्याची अधिक शक्यता आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावरील नुकसानीमुळे, यंदा देशातील सोयाबीन उत्पादनाचा आकडा गेल्या दशकातील सर्वात कमी पातळीवर जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 10:38 AM IST