कृषी हवामान : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पावसाचा धुमाकूळ सुरूच, 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरासह विदर्भात निर्माण झालेल्या दोन कमी दाब प्रणालींमुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मुंबई : बंगालच्या उपसागरासह विदर्भात निर्माण झालेल्या दोन कमी दाब प्रणालींमुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आज (18 ऑगस्ट) कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून रेड अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय उर्वरित कोकण, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट तर उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पावसाची स्थिती
मॉन्सूनचा सक्रिय पट्टा सध्या जैसलमेर, उदयपूर, रतलाम, विदर्भातील कमी दाब क्षेत्राचे केंद्र, जगदलपूर ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत पसरला आहे. ईशान्य अरबी समुद्रात गुजरात आणि कोकण किनारपट्टीलगत चक्राकार वारे वाहत आहेत. या अनुकूल हवामानामुळे कोकण, घाटमाथा आणि राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.
रविवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये मुंबईतील सांताक्रूझ येथे सर्वाधिक 250 मिमी, रत्नागिरीच्या सावर्डे येथे 230 मिमी, चिपळूण येथे 220 मिमी तर जळगावच्या दहीगाव येथे 200 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
advertisement
कुठे कोणता अलर्ट?
रेड अलर्ट : रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.
ऑरेंज अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली.
येलो अलर्ट : नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया.
पावसाचा जोर आणखी वाढणार
उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनारपट्टीलगत नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते उद्या (ता.19) जमिनीवर येण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भावर आणखी एक कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहे, ज्यासोबत समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली हळूहळू पश्चिमेकडे सरकत असून आज (ता.18) गुजरातकडे जाण्याचा अंदाज आहे. या दोन्ही प्रणालींमुळे राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढेल.
advertisement
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
सध्या खरीप हंगामातील पिके वाढीच्या टप्प्यात आहेत. सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी खालील काळजी घेणे गरजेचे आहे. जसे की,
पाणी निचरा व्यवस्थापन : शेतात पाणी साचू देऊ नये. नाले आणि पाण्याचे वाहून नेणारे मार्ग स्वच्छ ठेवावेत. पिकांच्या मुळाशी जास्त पाणी ठेवल्यास मुळकुज किंवा रोगांचा धोका वाढतो.
फवारणीचे नियोजन : सततच्या पावसामुळे कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हवामान थोडे खुलते तेव्हा कीडनाशके व बुरशीनाशकांची फवारणी करावी. तांदूळ, सोयाबीन, भाजीपाला यांसारख्या पिकांवर विशेष लक्ष ठेवावे.
advertisement
जमिनीची मशागत व आधार व्यवस्था : उभ्या पिकांसाठी आवश्यक असल्यास काठीचा आधार द्यावा, जेणेकरून जोरदार वाऱ्याने पिके पडणार नाहीत.
दरम्यान, ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यभरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी पाण्याचा निचरा, योग्य वेळी फवारणी आणि पिकांच्या आरोग्याची काळजी घेतल्यास नुकसान टाळता येऊ शकते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2025 7:53 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पावसाचा धुमाकूळ सुरूच, 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर