Women World Cup : 47व्या ओव्हरमध्ये फिरली अख्खी मॅच, टीम इंडियाला पराभवाचा शॉक, आफ्रिकेच्या क्लर्कची वादळी खेळी
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महिला वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का लागला आहे. भारताने दिलेलं 251 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने 48.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.
विशाखापट्टमण : महिला वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का लागला आहे. भारताने दिलेलं 251 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने 48.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग सुरू असताना 46 ओव्हरपर्यंत टीम इंडियाचा विजय होईल, असं वाटत होतं, पण 47 व्या ओव्हरमध्ये मॅच फिरली. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 24 बॉलमध्ये 41 रनची गरज होती, पण या ओव्हरमध्ये क्रांती गौडने 18 रन दिल्या, त्यामुळे दक्षिण आफ्रिका विजयाच्या जवळ पोहोचली.
क्रांती गौडच्या या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या नदिने डे क्लर्कने लागोपाठ दोन सिक्स आणि पुढच्या बॉलला फोर मारली. गौडच्या या ओव्हरनंतर डे क्लार्कने 48व्या ओव्हरमध्ये दीप्ती शर्माच्या बॉलिंगवर दोन फोर मारले आणि आफ्रिकेला विजयाच्या आणखी जवळ नेलं. पुढे 49 व्या ओव्हरमध्ये डे क्लर्कनेच अमनजोत कौरला 2 सिक्स मारून दक्षिण आफ्रिकेला थरारक विजय मिळवून दिला.
advertisement
नदिने डे क्लर्कने 54 बॉलमध्ये नाबाद 84 रनची खेळी केली. नदिनेच्या या खेळीमध्ये 5 सिक्स आणि 8 फोरचा समावेश होता, या इनिंगमध्ये तिने 155.56 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे. नदिने डे क्लर्कशिवाय दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वॉलव्हार्डटने 70 आणि क्लोई ट्रायनने 49 रनची खेळी केली. भारताकडून स्नेह राणा आणि क्रांती गौडला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर अमनजोत कौर, श्री चारिणी आणि दीप्ती शर्माला एक-एक विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
यंदाच्या वर्ल्ड कपमधला भारतीय टीमचा हा पहिलाच पराभव आहे. याआधी टीम इंडियाने श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने 3 पैकी 2 सामने जिंकले असून त्यांचाही एक पराभव झाला आहे.
रिचा घोषची झुंजार खेळी
दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताची अवस्था अत्यंत खराब झाली. 102 रनवरच भारताने 6 विकेट गमावल्या होत्या, पण त्यानंतर रिचा घोषने आधी अमनजोत कौर आणि त्यानंतर स्नेह राणाला सोबत घेऊन किल्ला लढवला. रिचा घोषने 77 बॉलमध्ये 94 रनची खेळी केली, ज्यात 11 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता.
advertisement
रिचा शर्माशिवाय प्रतिका रावलने 37 आणि स्नेह राणाने 33 रनची खेळी केली आहे. तर स्मृती मंधाना पुन्हा एकदा मोठा स्कोअर करण्यात अपयशी ठरली. 23 रनवरच स्मृती पॅव्हेलियनमध्ये परतली. कर्णधार हरमनप्रीत कौरलाही फक्त 9 रनच करता आले. टीम इंडियाने शेवटच्या 9 ओव्हरमध्ये तब्बल 97 रन केल्या, यातल्या बहुतेक रन या रिचा घोषच्या बॅटमधून आल्या.
advertisement
दक्षिण आफ्रिकेकडून च्लोई ट्रायनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर मरिझेन कॅप, नदिने डे क्लार्क आणि मलाबा यांना प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं. तुमी सेखुखुमेलाही एक विकेट मिळाली.
view commentsLocation :
Visakhapatnam,Andhra Pradesh
First Published :
October 09, 2025 11:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Women World Cup : 47व्या ओव्हरमध्ये फिरली अख्खी मॅच, टीम इंडियाला पराभवाचा शॉक, आफ्रिकेच्या क्लर्कची वादळी खेळी