"आता नियम समजावत बसू नका!"
हा व्हायरल होत असलेला स्पर्धक आहे गांधीनगर, गुजरातचा ईशित भट्ट नावाचा पाचवीतील विद्यार्थी. ईशित हॉट सीटवर बसताच त्याने अमिताभ बच्चन यांना जे म्हटले, ते ऐकून खुद्द बिग बीसुद्धा क्षणभर थक्क झाले. ईशितने अमिताभ यांना म्हटले, "मला सर्व नियम माहीत आहेत, त्यामुळे आता तुम्ही मला नियम समजावत बसू नका!" ईशितचे हे शब्द ऐकून स्टुडिओतील प्रेक्षकांनीही आश्चर्याने तोंडात बोट घातली.
advertisement
खेळ सुरू झाल्यावरही ईशितचे मध्ये-मध्ये बोलणे आणि प्रश्न विचारण्यापूर्वीच उद्धटपणे उत्तरं देणे सुरूच होते. अमिताभ बच्चन प्रश्न वाचून पूर्ण करत नाहीत तोच हा मुलगा त्यांना मध्येच थांबवत "अरे ऑप्शन सांगा!" प्रत्येक प्रश्नाला त्याचा हा उर्मट स्वभाव पाहायला मिळत होता.
मात्र एक प्रश्न असा आला जेव्हा, त्याच्या अति-आत्मविश्वासानेच त्याचा घात केला. ईशित त्याला विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे ऑप्शन जाणून न घेता उत्तरं देत होता. मात्र शेवटच्या प्रश्नाला त्याला ऑप्शनची गरज भासली. त्या प्रश्नाचं उत्तर देताना पुन्हा एकदा त्याचा उद्धट स्वभाव पाहायला मिळाला. 'सर, एक कशाला, त्याला चार लॉक लावा, पण लॉक करा!' जणू तो एक प्रकारे अमिताभ यांना आदेशच देत होता.
अतिउत्साह महागात पडला
हाच अतिआत्मविश्वास त्याला महागात पडला. 'वाल्मिकी रामायणातील पहिल्या कांडाचे नाव काय आहे?' या प्रश्नाचे उत्तर त्याने आत्मविश्वासाने 'अयोध्या कांड' दिले, जे चुकीचे ठरले. बरोबर उत्तर 'बाल कांड' हे होते. उत्तर चुकल्यामुळे त्याला कोणतीही रक्कम जिंकता आली नाही. त्याचे सगळे बक्षीस गमावल्यावर अमिताभ बच्चन यांनी त्याला हळूवारपणे समजावले, "कधीकधी मुले अतिआत्मविश्वासामुळे चुका करतात."
या एपिसोडचा क्लिप X वर लाखोंच्या संख्येने व्हायरल झाला आहे. अनेक युजर्सनी मुलाच्या बोलण्याच्या पद्धतीवर टीका केली आहे. एका युजरने लिहिले, "अहंकाराला धडा मिळाला. आता पालकांना तरी अद्दल घडेल." तर दुसऱ्याने म्हटले, "संस्कारांशिवाय ज्ञान निरुपयोगी आहे." अर्थात, काही लोकांनी त्याला केवळ उत्साहाचा भाग मानत लहान मुलावर जास्त टीका न करण्याची बाजू घेतली.