'मनाचे श्लोक' हे शीर्षक पवित्र धार्मिक भावनांशी जोडलेले आहे, त्यामुळे त्याचा वापर धार्मिक भावनांना धक्का देतो, अशी विरोधी संस्थांची भूमिका आहे. मात्र, चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा एक मोठा वर्ग या चित्रपटाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीकोनातून पाहत आहे.
चित्रपट हे कल्पनाशक्तीचे आणि वैचारिक मांडणीचे माध्यम आहे. अनेकदा कलात्मकता प्रचलित चौकटींना आव्हान देते आणि हा विचार धार्मिक भावना दुखावण्याचा नसतो, तर सामाजिक वास्तव दर्शवण्याचा असतो. केवळ शीर्षकावरून चित्रपटाला विरोध करणे, शूटिंगवर धडक देणे किंवा प्रदर्शन बंद पाडणे, हे कलाक्षेत्राच्या मूलभूत तत्त्वांना धक्का देणारे आहे.
advertisement
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली स्पष्ट भूमिका
दरम्यान, आता या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाने उडी घेतली आहे. एका परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी यावर स्पष्ट मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, चित्रपटकर्ते आणि निर्मात्यांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. समाजात मतभेद असू शकतात, पण तो संवाद संविधान आणि संस्कृतीच्या मर्यादेत, शांततेने आणि विवेकाने होणे महत्त्वाचे आहे.
प्रत्येक कलाकृती समाजात काहीतरी नवीन विचार आणते. तो विचार वेगळा असला तरी त्याला चर्चेची आणि स्वीकृतीची संधी मिळायला हवी. हेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे 'मनाचे श्लोक'ला कलाकृती म्हणून स्वीकारले जावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या परिपत्रकात पुढे म्हटले आहे, भारतीय चित्रपटसृष्टीत अशी अनेक उदाहरणे आहेत, जिथे चित्रपटांचे शीर्षक धार्मिक असले, तरी विषय पूर्णपणे वेगळा आहे. उदाहरणार्थ, हिंदीतील 'OMG', 'पीके', 'सत्यम् शिवम् सुंदरम्' किंवा मराठीतील 'तुकाराम' यांसारख्या चित्रपटांनी धर्म, श्रद्धा किंवा तत्त्वज्ञानावर विचारप्रवर्तक चर्चा घडवून आणल्या आहेत. हे चित्रपट धार्मिक प्रचारक नसून, सामाजिक मूल्ये, इतिहास आणि मानवी तत्त्वज्ञान मांडणारे आहेत. 'मनाचे श्लोक' हा चित्रपटदेखील मानवी मन, नैतिक मूल्ये आणि सामाजिक संघर्षांवर आधारित आहे. त्यामुळे धार्मिक नाव असले तरी, विषयावर तो धार्मिक नाही.