जमुई : आपल्या भारतात कोट्यावधी लोकांच्या दिवसाची सुरुवात चहानं होते. चहा प्यायल्यावर कसं शरीर, मन लगेच ऊर्जावान होतं. मात्र उपाशीपोटी चहा पिणं, वारंवार चहा पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, असं आहारतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे आज आपण फक्कड अशा आयुर्वेदिक चहाची रेसिपी पाहणार आहोत, जो चहा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
advertisement
डॉ. रास बिहारी यांनी या चहाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं, आपण ज्या चहाबाबत जाणून घेणार आहोत, त्यात लवंग, पुदिना आणि तुळशीच्या पानांचा समावेश केला जातो. त्यामुळे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असा हा चहा असतो.
लवंग, तुळस आणि पुदिन्याचा हा चहा तणाव, चिंता कमी करण्यास फायदेशीर ठरतो. यात असलेल्या अँटिऑक्सिडंट आणि नैसर्गिक गुणधर्मांमुळे हॉर्मोन्स संतुलित राहण्यास मदत मिळते. नियमितपणे हा चहा प्यायल्यानं हळूहळू ताण कमी होतो. तसंच पचनसंस्था उत्तम राहण्यासही हा चहा फायदेशीर असतो. यामुळे गॅस, अॅसिडिटीचा त्रास होत नाही, पोट व्यवस्थित साफ होतं, पोटातली घाण सहज बाहेर पडते. विशेषत: हिवाळ्यात या चहामुळे शरीराला उब मिळते. तसंच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
लवंग, तुळस, पुदिन्याचा चहा नियमित प्यायल्यानं डोकेदुखी दूर होऊ शकते. तुळस आणि पुदिन्यात थंड गुणधर्म असतात, तर लवंगात असणाऱ्या अँटिसेप्टिक गुणधर्मांमुळे डोकेदुखीवर आराम मिळतो. तसंच या चहामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि केसही छान चमकदार होतात.
कसा बनवावा चहा?
सर्वात आधी कपभर पाण्यात तुळशीची 3-4 पानं घ्यावी. त्यात 2-3 लवंग आणि काही पुदिन्याची पानं घालावी. मिश्रण व्यवस्थित उकळून घ्यावं. मग गाळून गरम गरमच प्यावं. यामुळे शरीर उर्जावान होण्यास मदत मिळू शकते.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.