आधार फाउंडेशनकडून मिळाली मशीन
प्रा. डॉ. सुभाष गवई लोकल18 शी बोलताना सांगतात की, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन येथे नवनवीन उपक्रम सुरू करत आहोत. आता नवीन उपक्रम म्हणजे शेणापासून जळाऊ लाकूड तयार करणे. विशेष म्हणजे मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या अमरावती शहरातील आधार फाउंडेशन या संस्थेकडून या प्रकल्पासाठी देणगी स्वरुपात मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नव्या प्रकल्पाच्या माध्यमातून कुष्ठ रुग्णांना नव्या रोजगारासाठी मोठा आधार मिळणार आहे.
advertisement
कुष्ठ बांधवांना रोजगाराचा नवा आधार मिळाला
कुष्ठ बांधवांच्या सेवेसाठी डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी 1950 मध्ये विदर्भ महारोगी सेवा मंडळाची स्थापना केली. त्यानंतर 87 एकर जागेवर तपोवन या नावाने कुष्ठ रुग्णांसाठी वसाहत उभारली. शासनाची कुठलीही मदत तपोवनला मिळत नाही. आज याठिकाणी राहणारे कुष्ठ रुग्ण बांधव कापड निर्मिती, लाकडाच्या वस्तूंची निर्मिती हा व्यवसाय करतात. आता आधार फाउंडेशनच्यावतीनं शेणापासून लाकूड तयार करण्याची मशीन तपोवनाला मिळाल्यामुळं येथील कुष्ठ बांधवांना रोजगाराचा नवा आधार मिळाला आहे, असं त्यांनी सांगितलं.
पर्यावरण संवर्धनात मोठी मदत होईल
पुढे ते सांगतात की, तपोवन परिसरात एक एकर जागेवर गोशाळा आहे. या गोशाळेत 70 गायी आणि म्हशी आहेत. या गायी आणि म्हशींचं शेण हे शेणखत म्हणून शेतात वापरलं जायचं. आता या शेणापासून लाकूड तयार करण्याचा प्रकल्प गोशाळेत सुरू करण्यात आलाय. यामुळं या प्रकल्पासाठी लागणारं शेण या गोशाळा परिसरात उपलब्ध आहे. तसेच झाडांचा निघणारा कचरा, सुतार विभागातील लाकडाचा भुसा देखील जळाऊ लाकूड बनविण्यासाठी आम्ही वापरत आहोत.
स्मशानात लागणाऱ्या लाकडांचा साचा, धार्मिक विधीसाठी लागणारे लाकूड आणि घरगुती तसेच हॉटेलमधील भट्ट्यांसाठी लागणारे लाकूड, अशा तीन प्रकारात शेणापासून लाकूड तयार होते. मशीनमधून तयार होऊन येणारं हे लाकूड सुरुवातीला ओले असते. त्याला उन्हात सुकवलं जातं. सुकलेलं हे लाकूड छान पेट घेतं. यामुळे वृक्ष तोडीला आला बसणार आहे.
आज हिंदू स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात लाकडांचा उपयोग होतो. त्या लाकडांऐवजी हे शेणापासून तयार झालेलं लाकूड वापरलं तर पर्यावरण संवर्धनात मोठी मदत होईल. अमरावती शहरातील सर्वात मोठी हिंदू स्मशानभूमी आणि विलास नगर परिसरातील स्मशानभूमी संचालक मंडळासोबत आमचं बोलणं सुरू आहे. या दोन्ही स्मशानभूमीत हॉटेल व्यावसायिकांपेक्षा अर्ध्या दरात शेणाचे लाकूड दिले जाईल, अशी माहिती प्रा. डॉ. सुभाष गवई यांनी दिली.