छत्रपती संभाजीनगर : हाच पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून महिला वटपौर्णिमेला उपवास करून वटवृक्षाची पूजा करतात, छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. इथं चक्क पुरुषांनी पूजा केली, परंतु वडाची नाही तर पिंपळाची. ही पत्नी आम्हाला 7 जन्म काय 7 सेकंदपण नको अशी प्रार्थना त्यांनी यावेळी यमराजाकडे केली. महिलांप्रमाणे पुरुषांवरही अन्याय, अत्याचार होतात, असं म्हणत पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारून ही 'पिंपळपौर्णिमा' साजरी केली.
advertisement
दरवर्षी महिला वटपौर्णिमेला साजश्रुंगार करून वडाच्या झाडाला धागा गुंडाळून त्याभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी मनोभावे पूजा करतात. परंतु आता महिलांनी पुरुषांवर अन्याय केल्याच्या घटनाही वारंवार समोर येतात. बायकोच्या त्रासाला कंटाळून आयुष्यभर तिच्यासोबत राहणं अवघड आहे, मग 7 जन्म कसं राहणार, असा सवाल करत पत्नीपीडित संघटनेकडून पिंपळपौर्णिमा साजरी करण्यात आली.
हेही वाचा : वटपौर्णिमा : आजूबाजूला वडाचं झाड नसेल तर कशी करावी पूजा? वडाची फांदी पूजणं चुकीचं!
भांडखोर बायकोसोबत नवरा राहू शकत नाही म्हणून पत्नीपीडित पुरुष आश्रम याठिकाणी गेल्या 8 वर्षांपासून पिंपळपौर्णिमा साजरी करून पिंपळाला साकडं घातलं जातं. ज्या ज्या नवऱ्यांना बायकोकडून त्रास झाला आहे, असे सगळे नवरे यावेळी 'आमच्या बायका वटवृक्षाला खोटंनाटं बोलून साकडं घालतील, त्यांचं ऐकू नका, पत्नीपीडितांची पत्नीपासून सुटका व्हायलाच हवी', असं साकडं पिंपळ वृक्षाला घालतात.
पुरुष आयोगाची मागणी!
पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग असावा, एकतर्फी कायद्यावर बंदी आणावी, प्रत्येक पोलीस ठाण्यात पुरुष दक्षता समिती स्थापन करावी, जिल्हा स्तरावर पुरुष तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे, कौटुंबिक वाद माननीय न्यायालयात गेल्यास एका वर्षाच्या आत निकाली काढावे, अशा या पुरुषांच्या मागण्या आहेत. 'आता देव तरी आमचं म्हणणं ऐकेल आणि दुष्ट बायकांच्या तावडीतून आमची सुटका करेल यासाठी पत्नीपीडित पुरुष आश्रमात पिंपळ पौर्णिमा साजरी केली जाते', असं संस्थेचे अध्यक्ष अॅड. भारत फुलारे यांनी सांगितलं.