वटपौर्णिमा : आजूबाजूला वडाचं झाड नसेल तर कशी करावी पूजा? वडाची फांदी पूजणं चुकीचं!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
शहरी परिसरात बऱ्याचदा आसपासच्या भागात वडाचं झाड नसतं, अशावेळी बाजारातून या झाडाची एखादी फांदी किंवा डहाळं विकत आणून त्याची पूजा केली जाते.
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस 'वटपौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सुवासिनी महिला पारंपरिक पेहरावासह साजशृंगार करून वडाच्या झाडाभोवती सात फेऱ्या मारून झाडाला धाग्यानं गुंडाळून त्याची पूजा करतात. तसंच पुढचे सात जन्म हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करत असतात. मात्र या सर्व विधी वडाच्याच झाडाजवळ का केल्या जातात, याची अचूक माहिती बऱ्याच जणांना ठाऊक नसते, त्यामुळेच कोल्हापुरातील धर्मशास्त्र अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
प्राचीन काळापासून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि पुढील सात जन्मांसाठी हाच पती मिळावा यासाठी सुवासिनी व्रत करत आल्या आहेत. मात्र वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी वडाच्याच झाडाला धागा गुंडाळणं यामागे सांस्कृतिक आणि परंपरागत कारण आहे. धर्मग्रंथांच्या आधारे सावित्रीनं आपल्या पतीचं म्हणजेच सत्यवानाचं प्राण यमदेवाकडून परत आणल्याची घटना वडाच्या झाडानजिक घडली. त्यामुळं वडाच्या झाडाला पुजण्याची परंपरा असल्याचे सर्वत्र मानले जातं. परंतु खरंतर भारतीय संस्कृतीतले सर्व सण कुठेतरी निसर्गाशी जोडलेले आहेत असं मिळतात. निसर्गाचं जतन करा, पर्यावरणाचं रक्षण करा, अशा प्रकारचा संदेश आपल्या प्रत्येक सणातून दिला जातो. प्रत्येक परंपरेमागे काहीतरी शास्त्रीय अर्थही आहे. वटपौर्णिमा हा अशाच प्रकारचा एक उत्सव, असं राणिंगा सांगतात.
advertisement
वटपौर्णिमेमागे नेमकं कारण काय?
वडाचं झाड हे सहसा कुणाच्या अंगणात वाढवलं जात नाही. तर ते सामान्यतः गावाबाहेर जंगल सदृश्य परिस्थितीत आढळून येतं. अशा ठिकाणी आपल्याला निसर्ग सौंदर्याची अनुभूतीही घेता येते. वडाच्या झाडाचा अक्षय वट असा पुराणात उल्लेख आढळतो. अक्षय वट म्हणजे एकदा ते झाड रुजलं की त्याचा मृत्यू होत नाही. या झाडाच्याच फांद्यांमधून, डहाळ्यातून, पारंब्यांतून नवे कोंब फुटून ते जमिनीत रूजतात. म्हणजेच वडाच्या झाडाची अक्षय्य स्वरूपात वाढ होते. याच अक्षय्य वाढणाऱ्या झाडाप्रमाणे आपल्या पतीला, आपल्या कुटुंबियांना दिर्घायुष्य लाभावं अशी भावना प्रत्येक सुवसिनीची असते. म्हणूनच वडाच्या झाडाखालीच वटपौर्णिमेच्या विधी केल्या जात असाव्या, असं मत रणिंगा यांनी व्यक्त केलं.
advertisement
आजूबाजूला वडाचं झाड नसेल तर काय करावं?
शहरीकरणामुळे तसंच बदलत्या काळाप्रमाणे सणाचं स्वरूपही बदलू लागलं आहे. अनेकदा केवळ औपचारिकता म्हणून या परंपरा पाळल्या जातात. खरंतर शहरी परिसरात बऱ्याचदा आसपासच्या भागात वडाचं झाड नसतं, अशावेळी बाजारातून या झाडाची एखादी फांदी किंवा डहाळं विकत आणून त्याची पूजा केली जाते. ती फांदी कुंडीत लावून त्याभोवती फेऱ्या मारल्या जातात. मात्र असं करणं चुकीचं आहे, असं राणिंगा सांगतात. कारण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ती फांदी कचरा पेटीत फेकली जाते. वटपौर्णमेच्या निमित्तानं अशा हजारो फांद्या तोडल्या जातात. त्यामुळे मूळ संस्कृतीनं ज्या कारणासाठी हा उत्सव निर्माण केला, त्या पर्यावरण रक्षणालाच छेद देणारा हा पर्याय आहे. त्यामुळे अगदीच वडाच्या झाडाभोवती विधी करायच्या असल्यास वडाच्या झाडाचं एखादं चित्र पुजून त्या भोवती फेऱ्या माराव्यात. असं केल्यानं मानसिक समाधान मिळू शकतं, असंही उमाकांत राणिंगा या सुचवलं.
advertisement
दरम्यान, हिंदू संस्कृतीत सणांच्या विधी आणि परंपरांच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचा मुख्य हेतू असताना वडाच्या झाडाची तोडलेली फांदी पुजण्याच्या परंपरेमुळे वृक्ष संवर्धन न होता वृक्षतोड होते. त्यामुळे तसं न करता त्यातून मार्ग काढत आपली परंपरा जपत आपल्याला निसर्गाचा समतोल निश्चितपणे साधता येऊ शकतो, असं राणिंगा यांनी स्पष्ट केलं.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
June 21, 2024 8:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वटपौर्णिमा : आजूबाजूला वडाचं झाड नसेल तर कशी करावी पूजा? वडाची फांदी पूजणं चुकीचं!