जालना : चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच, एवढा चहा भारतीयांमध्ये लोकप्रिय आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात चहानेच लोकांच्या दिवसाची सुरुवात होते. आता तर चहाचे वेगवेगळे ब्रँड आणि प्रकारही पाहायला मिळतात. प्रत्येक शहरात चहाचं फार जुनं किंवा प्रसिद्ध असं हॉटेल असतं. जालना शहरात जयशंकर इथं मिळणारा चहा अतिशय लोकप्रिय असून तब्बल 65 वर्षांपासून हा उत्तम क्वालिटीचा चहा मिळतो. विशेष म्हणजे इथं 12 रुपयांना हाफ चहा मिळत असला तरी दररोज 70 ते 80 लिटर दुधाचा चहा याठिकाणी विकला जातो. पाहूया जालन्यातील या सर्वात फेमस जयशंकर हॉटेलच्या चहाची नेमकी खासियत काय आहे.
advertisement
जालना शहरातील अलंकार टॉकीज परिसरात नरेश रामरक्षा यांचं 1960 सालचं जयशंकर नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये मिळणारा चहा हा फार पूर्वीपासून लोकप्रिय आहे. 12 रुपयांना हाफ आणि 24 रुपयांना फुल्ल असा इथला चहाचा दर. हॉटेलचं लोकेशन आणि चहाची उत्तम चव यामुळे इथं सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत चहा घेणाऱ्यांची गर्दी असते. तसंच हॉटेलमध्ये चहा पिणाऱ्या व्यक्तींसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे चहाप्रेमींना चहाबरोबर गप्पा-गोष्टींचा आस्वादही घेता येतो.
हेही वाचा : Mumbai Street Food: 7 सर्वोत्तम फूड स्पॉट, पदार्थ पाहूनच तोंडाला सुटतं पाणी
या हॉटेलवर जॉन इरिसान हे मागील 28 ते 30 वर्षांपासून चहा बनवण्याचं काम करतात. चहा बनवण्यात त्यांचा हातखंडा असून त्यांच्या हाताची चव जालन्यातील चहाप्रेमींना भुरळ घालते. इथं चहा बनवण्यासाठी म्हशीचं ताजं दूध वापरलं जातं. तसंच चहामध्ये केवळ दुधाचाच वापर केला जातो. दुधात अजिबात पाणी वापरत नाहीत. त्यामुळे दररोज तब्बल 70 ते 80 लिटर दुधाची आवश्यकता इथं असते. चहाबरोबर खाण्यासाठी खारी, टोस्ट, बिस्किट, इत्यादी खाद्यपदार्थदेखील ग्राहकांना सर्व्ह केले जातात.
'1960मध्ये आमच्या वडिलांनी हे हॉटेल सुरू केलं होतं. मी 1980पासून हॉटेलवर बसतो. आम्ही तिघं भाऊ मिळून हॉटेल चालवतो. इथं सर्व जाती-धर्माचे लोक येतात, आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात. आमचे आणि ग्राहकांचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत. केवळ 50 पैशांपासून मी या हॉटेलवर चहाची विक्री केलीये आता चहा 24 रुपयांपर्यंत विकला जातोय तरीसुद्धा ग्राहकांची गर्दी कधीच कमी होत नाही', असं हॉटेल मालक नरेश रामरक्षा यांनी सांगितलं.
हेही वाचा : बांबूचा मुरंबा खाल्लाय कधी? रेसिपी सोपी, चव आणि फायदे दोन्ही लय भारी!
तर, 'मी मागील 10 ते 12 वर्षांपासून इथं चहा पितो. इथल्या चहाची क्वालिटी उत्तम आहे. बसायला वगैरे जागापण चांगली आहे. यामुळे आम्ही दररोज इथं येतो, 2 ते 3 वेळा इथंच चहा पितो. इतर चहाच्या तुलनेत इथला चहा एकदम मस्त असतो', असं ग्राहक कार्तिक हिवाळे यांनी सांगितलं.