जालना : आपल्या देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त होणारा ध्वजारोहण सोहळा व त्यानंतर राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणारी भव्य दिव्य परेड पाहण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते. मात्र, सर्वांनाच ही संधी मिळत नाही. पण जालना जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळा सेवली येथील इयत्ता दहावी वर्गात शिकणारी विद्यार्थिनी अनिता काकडे हिला ही संधी मिळाली आहे.
advertisement
नवोदय विद्यालया अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रेरणा परीक्षेत उत्तम यश मिळवल्याने तिलाही संधी मिळाली आहे. याबाबत तिच्या काय भावना आहेत आणि तिची निवड प्रक्रिया कशी पार पडली, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने तिच्याशी संवाद साधला.
जालना शहरापासून तब्बल 50 किमी अंतरावर शिवली हे जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागातील गाव आहे. या गावात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थिनी अनिता आसाराम काकडे हिला दिल्ली येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. अनिता हिच्या बरोबरच परतूर येथील एका विद्यार्थ्याला देखील ध्वजारोहण सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले.
Weight loss : वाढत्या वजनाला लावा ब्रेक, फक्त ‘ही’ गोष्ट करा आणि राहा टेन्शन फ्री
या दोन्ही विद्यार्थ्यांना ट्रेनची तिकिटे काढून देण्यात आली आहेत. त्यांच्यासोबत एक शिक्षिका देखील असणार आहे. 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट असा या दोन विद्यार्थ्यांचा दिल्ली दौरा असणार असून जालना जिल्ह्यातील केवळ या दोनच विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली आहे.
नवोदय विद्यालया अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रेरणा परिक्षेतून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. प्रेरणा परीक्षेसाठी जिल्हाभरातील शाळेतून प्रत्येकी एका विद्यार्थ्याला परतुर येथील आंबा येथे असलेल्या नवोदय विद्यालयात पाठवण्यात आले. तब्बल 200 ते 300 विद्यार्थ्यांनी या लेखी परीक्षेत भाग घेतला. परीक्षेतील गुणांच्या आधारे 15 विद्यार्थी आणि पंधरा विद्यार्थिनींची निवड करण्यात आली.
30 विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीची मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली. यानंतर या दोन विद्यार्थ्यांना गुजरात येथे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी नेण्यात आले आणि आता 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी या दोन विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून निमंत्रित करण्यात आल्याचे शिक्षक परमेश्वर जाधव यांनी सांगितले.
एवढ्या कमी वयामध्ये दिल्ली येथील राष्ट्रपती भवनावरची परेड पाहण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शिक्षक आणि गावातील नागरिक तसेच जिल्हाभरातून या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मला राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी जाण्याची संधी मिळते आहे, याचा खूप आनंद होत आहे. आमच्या शाळेतील शिक्षक यांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळेच मला ही संधी मिळाल्याचे विद्यार्थिनी अनिता काकडे हिने सांगितले.