जालना : आयुष्यात प्रत्येक जण यशस्वी होण्याचे स्वप्न पाहत असतो. अनेक जण प्रयत्न करतो, धडपड करतो. यात काहींना यश मिळते तर काहींना अपयश येते. मात्र, संघर्ष करून मिळवलेल्या यशाची बात काही औरच असते. जालन्यातील अरबाज शेख हा तरुण या तरुणाने हे सिद्ध करुन दाखवले आहे.
त्याचे वडील नवीन मुंड्यातील गुळ मार्केटमध्ये हमालीचे काम करतात. तर त्याची आई शिलाई मशीन वर कपडे शिवून कुटुंबाला हातभार लावते. स्वतःअरबाजने वेगवेगळी कामे करून शिक्षण पूर्ण केलं. नुकतीच पोलीस भरती प्रक्रियेची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये अरबाज शेख याची मीरा भाईंदर येथे पोलीस म्हणून निवड झाली आहे.
advertisement
त्याच्या या यशानंतर त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावर आहे. अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत पोलीस शिपायाची वर्दी मिळवणाऱ्या अरबाज शेखच्या संघर्षाची कहाणी कशी आहे, हे जाणून घेऊयात.
जालना शहरातील लालबाग या परिसरामध्ये अरबाज आणि त्याचे कुटुंब राहते. लालबागची ओळख तशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला परिसर म्हणून आहे. याठिकाणी छोटी छोटी आणि पत्र्याची झोपडी वजा असलेली घरे, शैक्षणिक वातावरण नाही की कुठल्या सुविधा नाहीत. त्याचे अनेक नातेवाईक त्याला शिक्षण सोडून कामधंदा करण्यास सुचवायचे. मात्र, अरबाज स्वतःच्या शिक्षणापुरते पैसे स्वतःच कमवून स्वतःचं शिक्षण सुरू ठेवायचा.
दहावीनंतर त्याने चिकन विकणे, मोसंबी तोडण्यासाठी जाणे, केटरिंग म्हणजेच वाढपी म्हणून काम करणे, अशी कामे केली. 2023 पासून तो पोलीस भरतीची तयारी करत आहे. पोलीस भरतीची तयारी करत असताना त्याला दोन-तीन वेळा अपयश देखील आले. मात्र, खचून न जाता दररोज अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करणे आणि सायंकाळच्या वेळी मैदानी चाचणीचा सराव करणे सुरूच ठेवले.
शेवटी नुकत्याच झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत त्याने निवड यादीत स्थान मिळवले. लेखी परीक्षेत 82 तर मैदानी चाचणीत 39 असे एकूण 121 गुण अरबाज यायला मिळाले. महाराष्ट्र पोलीस दलातील मीरा-भाईंदर येथे त्याची पोलीस शिपाई म्हणून निवड झाली. त्याच्या या निवडीबद्दल त्याचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रांनी त्याचे स्वागत केले. आतापर्यंत जे लोक नावे ठेवत होती, शिक्षण सोडून काहीतरी काम धंदा कर, असं सुचवत होती, तीच लोकं आता स्वागतासाठी येत आहेत.
आई-वडिलांचा मी एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे मी पोलीस झालो हेच त्यांच्यासाठी खूप मोठे आहे. अजूनही त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करेल, असे अरबाज म्हणाला. आमची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्याला फार पैसे देण्याची आवश्यकता ही आम्हाला पडली नाही, तशी त्याने पडू दिली नाही. स्वतःचे पैसे तो स्वतःच कमवायचा. आता तो पोलीस होत असल्याने आम्हाला अतिशय आनंद होत आहे, असे त्याची आई अनिसा जब्बार शेख यांनी सांगितले.