पुण्याच्या गल्लीबोळात गणेशोत्सव साजरा होतो. त्यामुळे रफिक देखील बालपणापासूनच गणेशोत्सवाच्या वातावरणाशी एकरूप झाला. त्याने लहानपणी मित्रांसोबत गणपती मंडळात जायला सुरुवात केली. तिथेच त्याच्या मनात भक्तीची बीजं रोवली गेली. काळ जसजसा पुढे सरकला तसतसे गणपतीबद्दलचं त्याचं प्रेम अधिक घट्ट झालं. आजही तो मोठ्या श्रद्धेने दररोज गणपतीची आरती करतो.
advertisement
गणपतीची सेवा ही फक्त धार्मिक नाही तर सामाजिक जबाबदारी असल्याचे रफीक मानतो. त्यामुळेच उत्सवात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची तो हसतमुखाने सेवा करतो. त्याच्या या कार्यामुळे परिसरातील नागरिकही त्याचं कौतुक करतात. गणेशोत्सव हा उत्सव हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे, याचं रफीक शेख हा जिवंत उदाहरण आहे. रफीक म्हणाला, "गणपती बाप्पा सर्वांचे आहेत. भक्तीला धर्माची बंधने नसतात. बाप्पांची सेवा करण्यामध्ये मला अपार आनंद मिळतो.
घरातून मिळाले सर्वधर्म समभावाचे धडे
रफिकला लहानपणापासून घरातूनच सर्वधर्मसमभावाची शिकवण मिळाली आहे. प्रेम आणि श्रद्धा ही प्रत्येक धर्माचा आधार असते, असं त्याच्या पालकांनी त्याला शिकवलं आहे. त्यामुळेच तो आज समाजातील प्रत्येक कार्यासाठी स्वतःला बांधील समजतो. तो गणेश उत्सव आणि इतर सणांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतो. सध्याच्या विभाजन आणि कटुतेच्या वातावरणात रफीक शेखसारखी माणसं खरी 'भक्ती' म्हणजे काय, हे दाखवून देत आहेत.