तरुण लेखक प्रतिक दीपक पाटोळे हे वाळवा तालुक्यातील पोखरणी गावचे सुपुत्र आहेत. प्रतिक यांना कुटुंबातून अभ्यासू आणि विवेकी मूल्यांचा वारसा लाभला. कोल्हापूरच्या वारणानगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी बी.ई. सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.
इयत्ता तिसरीच्या वर्गात असताना 'इन्कलाब जिंदाबाद' म्हणत तीन मुलं फासावर गेल्याचं ऐकलं होतं. तेव्हापासून भगतसिंगांची प्रतिमा मनात होती. पुढे कॉलेजला गेल्यानंतर भगतसिंगांचे वेडच लागले. 23 वर्षांचा मुलगा फासावर जातो म्हणजे काय? एवढा त्याग का आणि कशासाठी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायला सुरुवात करण्यासाठी भगतसिंगांबद्दल उपलब्ध असणारे खरे संदर्भ, माहिती वाचायला सुरुवात केल्याचे प्रतिक सांगतात.
advertisement
सोशल मीडियावरून व्यक्त
एक-एक संदर्भ समजून घेत सुरुवातीला सोशल मीडियावरून लिहिले. लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांनी आणखी लिहिण्याची प्रेरणा मिळाल्याचे प्रतिक यांनी सांगितले. पुढे प्रसिद्ध उद्योजक शरद तांदळे यांना भेटल्यानंतर त्यांनी मराठीमध्ये भगतसिंगांवर फारसं कुणी लिहिले नाही. तू लिही. अभ्यासपूर्ण लिही, असे सांगून मराठीमधून एक दर्जेदार चरित्र ग्रंथ तयार करण्यास प्रोत्साहन दिल्याचे प्रतिक यांनी सांगितले.
सखोल संशोधन
इतिहास अभ्यासाची आवड आणि भगतसिंगांबद्दल संशोधनाच्या ध्यासातून प्रतिक यांनी ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे मार्गदर्शन घेतले. भगतसिंगांचे सहकारी मित्र यांनी लिहिलेली पुस्तके, तत्कालीन लेख, वृत्तपत्रातील बातम्या, ऐतिहासिक दस्तऐवज तसेच समकालीन साहित्याचे सखोल संशोधन केले आहे. पुढेही भगतसिंगांबद्दल संशोधन सुरू ठेवत सामाजिक संवर्धनासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिक सांगतात.
सांगलीचा इंजिनिअर मुलगा
तरुण लेखक प्रतिक यांनी डोळसपणे वाचन, लेखन करत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी जमीन सर्वेक्षणाचा व्यवसाय जिद्दीने विस्तारला आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात देखील भगतसिंगांचे विचार कायम प्रेरणा देत असल्याचे प्रतिक सांगतात.
आजची सामाजिक स्थिती पाहता आदर्श विचारांची समाजाला गरज असल्याचे दिसते. वीर भगतसिंगांची प्रेरणा पुस्तकरूपाने समाजासमोर ठेवत 'वो मुझे मार सकते हैं, लेकिन मेरे विचारों को नहीं मार सकते!' हे भगतसिंगांचे शब्द तरुण लेखक प्रतिक यांनी आजच्या काळात देखील सिद्ध केले आहेत.