सोलापूर : केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, ही म्हण सर्वांनीच ऐकली असेल. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावात राहणारा रहिमान शेखने हा तरुण. त्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वतःचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरू केला आहे. आज जाणून घेऊयात त्याची प्रेरणादायी कहाणी.
रहिमान शेख याचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. रहिमान शेख याच्या वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली. घरात तीन बहिणी आणि आई असा परिवार त्याला सांभाळायचा होता. त्याचबरोबरच त्याला बहिणींची लग्ने ही करायचे होती. त्यामुळे रहिमान आपले गाव सोडून मुंबई येथे काम करण्यासाठी गेला.
advertisement
तिथे दादरच्या फुल मार्केटमध्ये त्याला काम मिळाले. मात्र, फार जास्त पैसे मिळत नसल्याने त्याने तेथील काम सोडून पुणे येथे एका खाजगी कंपनीत कामाला सुरुवात केली. पुण्यात चांगला पगार मिळू लागला. राहणे, जेवणाचा खर्च काढून उरलेल्या पैशातून रहिमानने आपल्या बहिणीचे लग्न केलं. संपूर्ण काम शिकून घेतल्यानंतर रहिमान आपल्या मूळगावी परत आला आणि तेथेच आपल्या घराच्या काही अंतरावर पत्राच्या शेडमध्ये फॅब्रिकेशनचा लहानसा कारखाना सुरू केला.
छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांना होतोय फायदा, शासकीय दंत महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम आहे तरी काय?
वेल्डिंग मारणे, लोखंडी गेटचा जर अँगल तुटला असेल तर ते वेल्डिंग करून देणे, सुरुवातीला या फॅब्रिकेशनच्या कारखान्यात अशी लहान लहान कामे येत होती. पण आज रहिमान हा मोठमोठ्या कंपनीचे गोडाऊन बनविणे, लोखंडी खिडक्या तयार करणे, लोखंडी दरवाजा, उसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची कामे करणे, लोखंडी जिना बनविणे, आदि कामे करत आहे.
त्याच्या या फेब्रिकेशनच्या कारखान्यांमध्ये पाच युवकांना रोजगारही मिळाला आहे. त्यामुळे लहानशा फॅब्रिकेशनच्या कारखान्यामध्ये रहिमान आज काम करत लाखोंची उलाढाल करत आहे. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याचा हा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.