नवी मुंबईहून चार प्रमुख शहरांसाठी स्टार एअर नवीन विमानसेवा सुरू करणार असून त्यामध्ये अहमदाबाद, गोवा (मोपा), बंगळूर आणि नांदेड या शहरांचा समावेश आहे. कंपनीने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार नवी मुंबई–अहमदाबाद थेट सेवा उपलब्ध असेल. तसेच अहमदाबादमार्गे नवी मुंबई–नांदेड, मोपामार्गे नवी मुंबई–गोवा आणि मोपामार्गे नवी मुंबई–बंगळूर अशा जोड उड्डाण सेवाही प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहेत.
advertisement
या मार्गांवर उड्डाणासाठी स्टार एअर आपल्या आधुनिक एम्ब्रेअर 175 प्रकारच्या विमानांचा वापर करणार आहे. ही विमाने कमी अंतराच्या प्रवासासाठी उपयुक्त असून प्रवाशांना आरामदायी व सुरक्षित प्रवासाचा अनुभव देतात.
स्टार एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन सिमरन सिंग तिवाना यांनी सांगितले की, “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सेवा सुरू करणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. खऱ्या भारताला जलद, परवडणाऱ्या आणि वेळेची बचत करणाऱ्या विमानसेवांद्वारे जोडण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
स्टार एअर ही संजय घोडावत ग्रुपची विमान कंपनी असून तिने 2019 मध्ये आपल्या व्यावसायिक उड्डाण सेवांना सुरुवात केली. सध्या कंपनीच्या ताफ्यात एकूण 12 विमाने आहेत ज्यामध्ये 8 एम्ब्रेअर 175 आणि 4 एम्ब्रेअर 145 विमानांचा समावेश आहे. येत्या 36 महिन्यांत ताफा 25 विमानांपर्यंत वाढवण्याची महत्त्वाकांक्षी योजना कंपनीने आखली असून, देशांतर्गत प्रादेशिक हवाई संपर्क अधिक मजबूत करण्यावर स्टार एअरचा भर आहे.






