पश्चिम रेल्वे मार्गावर 26 जानेवारीपासून वातानुकूलित लोकलच्या 12 अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे सध्या धावणाऱ्या एसी लोकल फेऱ्यांची संख्या 109 वरून 121 इतकी वाढणार आहे. तसेच शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी चालवण्यात येणाऱ्या वातानुकूलित लोकलची संख्या 65 वरून 77 इतकी होणार आहे.
advertisement
सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात एकूण 8 वातानुकूलित रेक उपलब्ध आहेत. या रेकच्या सहाय्याने सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज 109 एसी लोकल फेऱ्या चालवण्यात येतात. नव्या निर्णयानंतर ही संख्या वाढून 121 होईल. यामध्ये सकाळच्या वेळेत 4 फेऱ्या, तर सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत 8 फेऱ्या धावतील. या अतिरिक्त फेऱ्यांमध्ये 5 जलद (फास्ट) आणि 7 धीम्या (स्लो) लोकलचा समावेश करण्यात आला आहे.
अप मार्गावर
पहाटे 5.14 वाजता गोरेगाव ते चर्चगेट (धिमी), सकाळी 7.25 वाजता बोरिवली ते चर्चगेट (जलद), सकाळी 10.08 वाजता विरार ते चर्चगेट (जलद), दुपारी 12.44 वाजता भाईंदर ते चर्चगेट (जलद), दुपारी 3.45 वाजता विरार ते चर्चगेट (धिमी) आणि सायंकाळी 7.06 वाजता गोरेगाव ते चर्चगेट (धिमी).
डाऊन मार्गावर
सकाळी 6.14 वाजता चर्चगेट ते बोरिवली (धिमी), सकाळी 8.27 वाजता चर्चगेट ते विरार (जलद), सकाळी 11.30 वाजता चर्चगेट ते भाईंदर (जलद), दुपारी 1.52 वाजता चर्चगेट ते विरार (धिमी), सायंकाळी 5.57 वाजता आणि रात्री 8.07 वाजता चर्चगेट ते गोरेगाव (धिमी) अशा वातानुकूलित लोकल धावणार आहेत.
या अतिरिक्त एसी लोकल फेऱ्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होणार असून पश्चिम रेल्वे मार्गावरील गर्दीचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






