मुंबई : राज्यातील थंडीचा जोर कमी झाला असून काही भागांत उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील कमाल तापमानात सर्वधिक वाढ झाली आहे. तसेच राज्यात प्रमुख शहरांतील किमान तापमानात वाढ झाल्याने सर्वत्र थंडीचा कडाका कमी झालेला दिसून येत आहे. काही भागांत ढगाळ वातावरण सुद्धा बघायला मिळत आहे. एकांदरीत राज्यात संमिश्र वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरात 19 जानेवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असून तेथील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळी उकाडा जाणवत असल्याचे दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत मुंबईतील किमान तापमानात वाढ होऊन 21 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
19 जानेवारीला पुण्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. पुढील दोन दिवसांत पुण्यातील किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 19 जानेवारीला निरभ्र आकाश असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये 19 जानेवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये सुरुवातीपासूनच थंडीचा जोर जास्त असल्याचे बघायला मिळाले. आता मात्र नाशिकमधील किमान तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी झालाय.
विदर्भातील नागपूरमध्ये 19 जानेवारीला अंशतः ढगाळ वातावरण असणार आहे. नागपूरमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये पुढील काही दिवसांत किमान तापमानात वाढ होऊन निरभ्र आकाश बघायला मिळणार आहे.
राज्यातील वातावरणात सतत बदल होताना आपण बघत आहोत. सध्या राज्यात सर्वत्र थंडीचा जोर कमी झालाय. मात्र, तुरळक ठिकाणी उकाडा जाणवत असल्याचे दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत तुरळक ठिकाणी किमान तापमानात वाढ होणार आहे तर काही ठिकाणी किमान तापमानात घट होऊन थंडीचा जोर थोडा वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. राज्यातील वातावरणात सतत बदल होत असल्याने विविध आजार उद्भवत आहेत. नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.





