मुंबई : राज्यातील किमान आणि कमाल तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. यामुळे गारठा देखील कमी अधिक प्रमाणात जाणवत आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये घट होऊन थंडी वाढल्याचे पाहायला मिळू शकते. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कमाल आणि किमान तापमान कसे असेल पाहुयात.
advertisement
24 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात कोरडे हवामान पाहायला मिळेल. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील किमान तापमानामध्ये 2 अंशांनी वाढ होणार आहे. पुणे शहरात सकाळच्या वेळी धुकं असेल. त्याचबरोबर ढगाळ आकाश पाहायला मिळेल. पुण्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
मित्राने दिला सल्ला, अंगठाबहाद्दर शेतकऱ्यानं केला अर्ध्या एकरमध्ये दुहेरी प्रयोग, लाखोंचे उत्पन्न
मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 जानेवारी रोजी निरभ्र आकाश राहील तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील किमान आणि कमाल तापमान मागील काही दिवसांपासून स्थिर असल्याचे पाहायला मिळतंय. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस किमान तापमान 12 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकमध्ये काही प्रमाणात गारठा जाणवणार आहे.
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपुरात थंडीचा कडाका अजूनही कायम आहे. नागपुरात 24 जानेवारी रोजी सामान्यतः निरभ्र आकाश राहणार असून कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस किमान तापमान 13 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे. नाशिक आणि नागपूरमध्ये काही प्रमाणात थंडी जाणवणार असून इतर राज्यात मात्र थंडीचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळते. मात्र आगामी काही दिवसांमध्ये किमान तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.





