मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातून थंडी जवळपास गायब असल्याचे चित्र आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे वगळता उर्वरित विभागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार वगळता सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तुरळक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचीही शक्यता आहे. पाहुयात पुढील 24 तासांत राज्यातील काही प्रमुख शहरात तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहील. तर मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे राहील. पुणे शहरामध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाची देखील शक्यता आहे. तर पुण्यातील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे राहील.
भन्नाट कलाकार अन् कलाकृती! सुईच्या छिद्रामध्ये साकारला येशू ख्रिस्ताचा पुतळा
उत्तर महाराष्ट्राला खराब हवामानाचा सर्वाधिक तडाखा बसणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांना 27 डिसेंबरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता संभवते. तर मराठवाड्यातील हवामान देखील पावसाला पोषक असणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये 27 आणि 28 डिसेंबर रोजी मध्यम पावसाची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी गारांसह पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये पुढील दोन दिवस मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर 28 डिसेंबरसाठी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. एकंदरीत उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा विजांचा कडकडाटासह पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी यांनी बदललेल्या हवामानानुसार आपल्या शरीराची आणि शेतातील पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.





