पुणे : पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांची पावलं पुण्यातील खास पर्यटनस्थळ असलेल्या भीमाशंकर अभयारण्य आणि देवस्थानाकडे वळतात. इथं पर्यटक आणि भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे ही माहिती महत्त्वाची आहे. वर्षा पर्यटनात झालेल्या अपघातात अनेकजणांचा मृत्यू झाल्याच्या घटना गेल्या दोन दिवसात समोर आल्या. या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यातील वर्षा पर्यटन येत्या 30 सप्टेंबरपर्यंत बंद असेल. त्यामुळे पर्यटकांनी वर्षा सहलीसाठी या भागात येऊ नये, नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेश वन विभागाकडून देण्यात आले आहेत. सुट्टीच्या दिवशी पुणे, मुंबईसह अनेक भागांमधून पर्यटक भीमाशंकर इथं येतात. सध्या इथल्या धबधब्यांच्या पाण्याचा जोर प्रचंड वाढला आहे, जर पोहताना प्रवाहाचा अंदाज आला नाही तर जीवघेणा अपघात घडू शकतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा : ही आहेत मुंबईत भेट देण्यासाठी सर्वोत्तम 9 पर्यटन ठिकाणे, संपूर्ण यादी एका क्लिकवर...
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यातील डोंगरदऱ्यांमधील जंगलवाटा पावसामुळे निसरड्या झाल्या आहेत. अनेक ठिकाणी गवत वाढल्यानं वाटा पुसल्या गेल्या आहेत, अशा परिस्थितीत अपघाताची, धुक्यामुळे वाट हरवण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन अभयारण्यातील सर्व निसर्गवाटा 1 जुलै ते 30 सप्टेंबरदरम्यान पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक (वन्यजीव) तुषार चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, भीमाशंकर देवस्थान दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अभयारण्यात फिरताना नियमांचं पालन करावं. परवानगीशिवाय अवैधपणे अभयारण्यात प्रवेश करू नये. तसंच प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर ‘वन्यजीव संरक्षण कायद्या’अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असं चव्हाण यांनी सांगितलं. तर, इतर धबधबेसुद्धा पर्यटनासाठी बंद करण्यात आले आहेत. त्यात कोंढवळ धबधब्याकडे जाणारे सर्व मार्ग, चोंडीचा धबधबा - खोपीवली नियतक्षेत्र, न्हाणीचा धबधबा - पदरवाडीजवळ, सुभेदार धबधबा - नारीवली नियतक्षेत्र, घोंगळ घाट नाला - खांडस ते भीमाशंकर मार्ग, शिडी घाट - पदरवाडी ते काठेवाडी पूर्णतः बंद आहे.