Pune Traffic: हिंजवडी-वाकड उड्डाणपुलाबाबत मोठी अपडेट, या वाहनांना तात्पुरती बंदी, पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pune Traffic: गुरुवारी सकाळपासून लाऊडस्पीकरच्या माध्यमातून या बदलाची घोषणा करण्यात आली.
पुणे: वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने भुजबळ चौकातील हिंजवडी-वाकड उड्डाणपुलावर दुचाकी वाहनांना तात्पुरती बंदी घातली आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या या नियमामुळे दुचाकीस्वारांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, या नियमाची तात्पुरती अंमलबजावणी किमान दोन आठवडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत परिपत्रक अद्याप प्रसिद्ध झालेलं नाही.
दुचाकीस्वारांना ठराविक वेळेतच उड्डाणपुलावरून बंदी
हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी सांगितलं की, गुरुवारी सकाळपासून लाऊडस्पीकरच्या माध्यमातून या बदलाची घोषणा करण्यात आली. उड्डाणपुलावर दुभाजक नसल्यामुळे, तो चारचाकी वाहनांसाठीच मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुचाकी वाहनांवरील बंदी ही कायमस्वरूपी नसून केवळ गर्दीच्या वेळेत लागू राहणार आहे. सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत दुचाकीस्वारांना उड्डाणपुलाचा वापर करता येणार नाही. मात्र, या वेळे व्यतिरिक्त दुचाकी वाहनांना नेहमीप्रमाणेच उड्डाणपुलावरून जाण्याची मुभा असेल.
advertisement
दुचाकींसाठी पर्यायी मार्ग
वाकडहून हिंजवडीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी उड्डाणपुलाचा वापर न करता सुर्या अंडरपासवर डावीकडे वळावे. तेथून लगेच यू-टर्न घेऊन पुढे जाता येईल. या वळणामुळे फक्त 50 ते 100 मीटर अतिरिक्त अंतर जोडलं जाईल.
हिंजवडीहून वाकडकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी सयाजी अंडरपासवर डावीकडे वळून यू-टर्न घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, या नवीन व्यवस्थेमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही अडचणी अथवा तक्रारी भुजबळ चौकातील हिंजवडी वाहतूक विभाग कार्यालयात किंवा चिंचवड गावातील एल्प्रो मॉलजवळील मुख्य वाहतूक शाखेत नोंदवाव्यात. ही माहिती वाहतूक विभागाच्या अहवालानुसार आहे. याबाबत अधिकृत परिपत्रक अद्याप जारी झालेलं नाही.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 11, 2025 4:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Traffic: हिंजवडी-वाकड उड्डाणपुलाबाबत मोठी अपडेट, या वाहनांना तात्पुरती बंदी, पर्यायी मार्ग कोणते?