वन्यसंपत्तीचा वारसा जपण्याचा संदेश
आपल्या महाराष्ट्राला मिळालेला वन्यसंपत्तीचा वारसा प्रत्येकाने जपणे आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. याच भावनेतून वैष्णवी पाटील यांनी हा अनोखा देखावा साकारला आहे. त्यांनी वर्णमालेच्या माध्यमातून प्रत्येक अक्षराशी निगडीत झाड दाखवले असून, त्या झाडांच्या बिया मांडून हा पर्यावरणपूरक देखावा उभारला आहे.
advertisement
देशी झाडांच्या संवर्धनाची गरज
आज अनेक देशी झाडांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे काही झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या झाडांचे संवर्धन व्हावे आणि लोकांना त्याचे महत्त्व कळावे, यासाठीच वैष्णवी पाटील यांचा हा प्रयत्न आहे. या देखाव्यामुळे प्रत्येकाला महाराष्ट्रातील समृद्ध वन्यसंपत्तीची माहिती मिळत आहे. यामध्ये देशी वनस्पतींच्या बियांचे प्रदर्शनही ठेवण्यात आले आहे.
प्रत्येक अक्षराशी संबंधित झाडांची ओळख
वैष्णवी पाटील यांनी तयार केलेल्या या पर्यावरणपूरक वर्णमालेत प्रत्येक अक्षराशी एक झाड जोडले गेले आहे. उदाहरणार्थ अ पासून अंजन, आ पासून आपटा, इ पासून इंद्रवृक्ष. अशा प्रकारे संपूर्ण वर्णमालेतून झाडांची ओळख करून देण्यात आली आहे. हा उपक्रम पाहताना मुलांना अक्षरांसोबत झाडांची नावे लक्षात ठेवणे सोपे जाते, तर मोठ्यांनाही देशी झाडांविषयी नव्याने माहिती मिळत आहे. त्यामुळे हा देखावा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक न राहता, शैक्षणिक व माहितीपूर्ण ठरत आहे.