क्रिकेटची आवड बनली प्रेरणा
रोहन पाटे मूळचे बिल्डर व्यवसायात असले तरी त्यांचं बालपण क्रिकेटच्या प्रेमातच गेले. त्यांनी अंडर-19 महाराष्ट्र संघाकडून खेळही केला होता. क्रिकेट विश्वाशी नातं कायम जपावं म्हणून त्यांचं नाव रोहन ठेवलं गेलं. ज्याचं प्रेरणास्थान होतं वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू रोहन कन्हाई. खेळाडू म्हणून पुढे कारकीर्द घडवता आली नाही, पण क्रिकेटसाठी काहीतरी करायचं हा ध्यास त्यांनी कायम ठेवला.
advertisement
2010 मध्ये त्यांना सचिन तेंडुलकर यांची ओरिजनल बॅट मिळाली आणि तिथूनच त्यांच्या संग्रहालयाच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यांनी ठरवलं की सचिनची बॅट मिळाली, तर इतर दिग्गज खेळाडूंचं सामानसुद्धा मिळवता येईल. आज त्यांच्या संग्रहात 75 हजारांहून अधिक क्रिकेटशी संबंधित वस्तू आहेत.
संग्रहालयातील वैशिष्ट्ये
ब्लेड्स ऑफ ग्लोरी म्युझिअममध्ये डॉन ब्रॅडमन यांच्यापासून ते आजच्या विराट कोहली पर्यंतच्या अनेक खेळाडूंच्या वस्तू आहेत. इथे सचिन, धोनी, विराट यांनी वापरलेल्या ओरिजनल बॅट्स, 10,000 पेक्षा अधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या बॅट्स, ट्रिपल सेंच्युरी करणाऱ्यांची उपकरणं, तसेच ग्रेट बॉलर्स चे शर्ट, ग्लव्ज, पॅन्ट यांचाही समावेश आहे.
याशिवाय, 1975 ते 2023 पर्यंतच्या वर्ल्ड कप विजेत्या संघांमधील खेळाडूंच्या सही असलेला एक स्वतंत्र विभाग इथे पाहायला मिळतो. इतकंच नव्हे तर, 1800 साली क्रिकेट कसं होत, यापासून आजच्या आधुनिक क्रिकेटपर्यंतचा प्रवास येथे अनुभवता येतो.
क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता
2012 साली या म्युझिअमचं उद्घाटन खुद्द सचिन तेंडुलकर यांनी केलं. त्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी स्वतः म्युझिअमला भेट दिली. आजपर्यंत 500 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू येथे भेट देऊन गेले आहेत. तर 20 लाख लोकांनी आतापर्यंत भेट देखील दिली आहे. त्यामुळे आता खेळाडू स्वतःहून आपल्या वस्तू संग्रहालयासाठी देतात, असं रोहन पाटे सांगतात.
अनंत मेहनतीचा प्रवास
हे यश सहज मिळालं नाही. एका सहीसाठी 18 तास वाट पाहणं, खेळाडूंच्या मागे लागणं, त्यांची भेट घेणं. हे सर्व करत त्यांनी हे संग्रहालय उभारलं. आज पुण्यात सुरू झालेल्या या संग्रहालयाला इंदोरमध्ये दुसरं केंद्र देखील तयार करण्यात आलं आहे.
क्रिकेट प्रेमापासून सुरू झालेला हा प्रवास आज एका जागतिक कीर्तीच्या संग्रहालयात परिवर्तित झाला आहे. पुण्यातील क्रिकेटप्रेमींसाठी हे म्युझिअम म्हणजे एक अमूल्य ठेवा ठरतोय.