Shravan 2025: यंदाच्या श्रावणात तरी चुकू नका! महादेवाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालताना 'सोमसूत्री' पाळा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shravan 2025: सोमसूत्री प्रदक्षिणा ही महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाच्या 'सोमसूत्राला' (जलहरीतून पाणी बाहेर पडणाऱ्या भागाला) महत्त्व देऊन केली जाते. जलहरीतून जे पाणी बाहेर पडते, ते शिवशक्तीचे प्रतीक मानले जाते आणि ते ओलांडणे वर्ज्य मानले जाते.
मुंबई : श्रावण महिना सुरू झाल्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये शिवभक्त गर्दी करतात. प्रत्येक देवतेच्या पूजा-पाठाचे नियम वेगवेगळे आहेत. तसेच महादेवाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचे काही विशिष्ट नियम आणि पद्धती आहेत. महादेवाच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते, त्याला सोमसूत्री प्रदक्षिणा असे म्हणतात. ही प्रदक्षिणा पूर्णपणे गोल न घालता विशिष्ट पद्धतीने केली जाते.
सोमसूत्री प्रदक्षिणा म्हणजे काय?
सोमसूत्री प्रदक्षिणा ही महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाच्या 'सोमसूत्राला' (जलहरीतून पाणी बाहेर पडणाऱ्या भागाला) महत्त्व देऊन केली जाते. जलहरीतून जे पाणी बाहेर पडते, ते शिवशक्तीचे प्रतीक मानले जाते आणि ते ओलांडणे वर्ज्य मानले जाते.
प्रदक्षिणा करण्याची योग्य पद्धत:
प्रारंभ करताना तुम्ही नंदीसमोरून मंदिराच्या दिशेने आत जाल तेव्हा, मंदिराच्या मुख्य दारातून आत प्रवेश करण्यापूर्वी, नंदीचे दर्शन घ्यावे. प्रदक्षिणा नेहमी उजवीकडून (मंदिराच्या) सुरू करावी. मंदिराच्या उजव्या बाजूने (नंदीच्या डाव्या बाजूने) प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात करा. तुम्ही गर्भगृहाच्या मागून फिरत जलहरीच्या (पाणी बाहेर पडणारी पन्हाळी) टोकापर्यंत या. जलहरीतून बाहेर पडणारे पाणी ओलांडू नका. ही जलहरी शिवलिंगाच्या शक्तीचा प्रवाह मानली जाते आणि ती ओलांडल्यास ऊर्जेचा प्रवाह खंडित होतो किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे मानले जाते. जलहरीच्या टोकापर्यंत आल्यावर, जलहरी न ओलांडता त्याच मार्गाने (घड्याळाच्या उलट्या दिशेने) परत या. पुन्हा नंदीच्या समोरून मंदिराच्या दुसऱ्या बाजूने (डाव्या बाजूने) जलहरीच्या दुसऱ्या टोकापर्यंत या. जलहरीच्या दुसऱ्या टोकापर्यंत आल्यावर, तेथून पुन्हा नंदीसमोरून परत या आणि तुमची एक प्रदक्षिणा पूर्ण होते.
advertisement
थोडक्यात सांगायचे तर महादेवाची प्रदक्षिणा अर्धवट असते. जलहरीतून पाणी बाहेर पडते, ती सोमसूत्रिका कधीही ओलांडू नये. जलहरीपर्यंत जाऊन परत यावे आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा जलहरीपर्यंत येऊन परत यावे. पूर्ण फेरी मारली जात नाही.
advertisement
प्रदक्षिणा करण्याचे नियम आणि महत्त्व -
जलहरी हे शिवलिंगातील शक्तीचे प्रतीक मानले जाते. जलहरीला स्पर्श करणे किंवा तिला ओलांडणे शुभ मानले जात नाही. प्रदक्षिणा घालताना मन शांत ठेवावे आणि 'ॐ नमः शिवाय' किंवा अन्य शिव मंत्रांचा जप करावा. प्रदक्षिणा करताना हात जोडून ठेवावेत. पूर्ण श्रद्धेने, भक्तीने प्रदक्षिणा करावी. सोमसूत्री प्रदक्षिणा शंकराला अत्यंत प्रिय मानली जाते. या पद्धतीने प्रदक्षिणा केल्याने शिवशक्तीचा पूर्ण आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील अडचणी दूर होतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 17, 2025 2:47 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan 2025: यंदाच्या श्रावणात तरी चुकू नका! महादेवाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालताना 'सोमसूत्री' पाळा