Maharashtra Bendur: महाराष्ट्रीय बेंदूर कसा साजरा केला जातो? बैलांप्रति इतक्या गोष्टी करण्याची परंपरा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Maharashtra Bendur 2025: आज महाराष्ट्रीय बेंदूर हा सण आहे. महाराष्ट्रातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील काही जिल्ह्यांमध्ये (कोल्हापूर, सांगली) महाराष्ट्रीय बेंदूर मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा सण आहे.
मुंबई : आपल्याकडं महाराष्ट्रात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात, त्यांचा संबंध शेतीशीही असतो. आज महाराष्ट्रीय बेंदूर हा सण आहे. महाराष्ट्रातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील काही जिल्ह्यांमध्ये (कोल्हापूर, सांगली) महाराष्ट्रीय बेंदूर मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा सण आहे. हा सण आषाढ पौर्णिमेला साजरा करण्याची परंपरा आहे. शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बैल आणि गायींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस समर्पित असतो.
महाराष्ट्रीय बेंदराचे महत्त्व: बेंदूर हा सण वर्षभर शेतीत शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून कष्ट करणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यांना 'सर्जा-राजा' असे संबोधून आदराने पूजले जाते. या दिवशी बैलांना कोणत्याही शेतीच्या कामाला जुंपले जात नाही. त्यांना दिवसभर पूर्ण विश्रांती दिली जाते. हा त्यांच्या कष्टांचा सन्मान करण्याचा दिवसही मानला जातो. बेंदूर सण हा निसर्ग, प्राणी आणि माणूस यांच्यातील अतूट नातेसंबंधाची जाणीव करून देतो.
advertisement
महाराष्ट्रीय बेंदूर कसा साजरा करतात?
बेंदूर सण साजरा करण्याची पद्धत अतिशय उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात असते. बैलांना स्नान आणि खांदेमळणी केली जाते सकाळपासूनच गाय-बैलांना स्वच्छ अंघोळ घातली जाते. त्यांच्या कष्टाचे प्रतीक असलेल्या खांद्यांना गरम पाण्याने शेकून हळद लावली जाते. याला 'खांदेमळणी' असेही म्हणतात, त्यामुळे त्यांना आराम मिळावा.
आंघोळ घातल्यानंतर बैलांना सुंदरपणे सजवले जाते. त्यांच्या शिंगांना रंगरंगोटी केली जाते आणि त्यावर बेगड लावले जाते. अंगावर झालर घातल्या जातात. त्यांच्या पाठीवर रंगीबेरंगी झूल घातली जाते. डोक्याला बाशिंग, गळ्यात घुंगरांच्या माळा आणि नवीन येसण, म्होरकी, कंडा घातला जातो.
advertisement
सजवलेल्या बैलांची घरात मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी बैलांसाठी खास नैवेद्य तयार केला जातो. हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे (गोड कडबोळी) बैलांच्या शिंगांवर ठेवून त्यांना खाऊ घातले जाते. पुरणपोळीचा नैवेद्यही दिला जातो. महिला दारात सडा-रांगोळी काढून बैलांचे स्वागत करतात आणि पंचारतीने त्यांना ओवाळतात.
advertisement
मातीच्या बैलांची पूजा: ज्या शेतकऱ्यांकडे बैल नसतात, ते घरात मातीचे छोटे बैल तयार करतात किंवा विकत आणतात. त्यांचीही मनोभावे पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. दुपारनंतर सजवलेल्या बैलांची ढोल-ताशांच्या गजरात आणि वाद्यांच्या निनादात मोठी मिरवणूक काढली जाते. काही गावांमध्ये 'कर तोडणे' या परंपरेचे आयोजन केले जाते. यामध्ये पिंजर (एक प्रकारची माती) आणि पिंपळाची पाने वापरून एक लांबलचक 'कर' तयार केली जाते आणि सजवलेला मानाचा बैल त्यावरून उडी मारून ती तोडतो. याला ग्रामीण संस्कृतीत मोठे महत्त्व दिले जाते. या दिवशी जनावरांना केवळ हिरवा चाराच दिला जातो, ज्यामुळे त्यांची पचनक्रिया चांगली राहते.
advertisement
बेंदूर आणि बैलपोळा यातील फरक:
महाराष्ट्रामध्ये बेंदूर आणि बैलपोळा हे दोन्ही सण बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरे केले जातात, परंतु त्यांच्या तिथीमध्ये फरक आहे. आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो. हा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जिल्ह्यांमध्ये जास्त प्रचलित आहे. श्रावण अमावास्येला (पिठोरी अमावस्या) साजरा केला जातो. हा महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये (उदा. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र) अधिक प्रमाणात साजरा होतो. पद्धत आणि भावना जरी सारख्या असल्या, तरी दोन्ही सणांच्या तिथी आणि भौगोलिक प्रचारात फरक आहे. बेंदूर सण हा शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या साथीदाराचा सन्मान करणारा आणि त्यांच्याप्रती प्रेम व कृतज्ञता व्यक्त करणारा एक सुंदर उत्सव आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 09, 2025 8:28 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Maharashtra Bendur: महाराष्ट्रीय बेंदूर कसा साजरा केला जातो? बैलांप्रति इतक्या गोष्टी करण्याची परंपरा