'मठाचा मीच पुजारी आणि मालक' म्हणत लिंगायत समाजाच्या धर्मगुरूला मठातच अमानुष मारहाण, पंढरपूरमधील घटना
- Published by:sachin Salve
- Reported by:Virendrasigh Utpat
Last Updated:
रात्री 9 वाजता मठामध्ये खोलीत राचोटेश्वर स्वामीजी झोपण्याकरिता जात असताना आरोपींनी मठामधील सीसीटीव्हीची तोडफोड केली
पंढरपूर: "या मठाचा मीच पुजारी आणि मालक असून तू बाहेरुन आलेला आहे, तुझा येथे काहीही एक संबंध नाही "असं म्हणत सिध्दनकेरी येथील मठाच्या वादावरुन धर्मोपदेशकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गावातील गुंडांनी लाथाबुक्या आणि लोखंडी रॉडने मठातच मारहाण केली. या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मठात राहणारे राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी (वय 64 रा.सिध्दनकेरी) यांना मारहाण झाली आहे. या प्रकरणी राजू लिंगाप्पा कोरे,मंजूनाथ सकलेश कोरे, भिमू सिध्दाप्पा कोरे, प्रमोद रेवाप्पा कोरे,संतोष रामचंद्र कोरे, सिध्दू येसाप्पा कोरे या सहा जणाविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी राचोटेश्वर स्वामीजी हे सिध्देनकेरी येथील तोफकट्टी संस्थान मठात गेली 36 वर्षापासून राहत आहे. राचोटेश्वर स्वामी हे तोफकट्टी संस्थानमध्ये मठपती म्हणून धर्मोपदेशनाचे काम करीत आहेत. या मठातच सिद्धेश्वर मंदिर ही आहे. फिर्यादीच्या सोबत सेवेत त्यांची शिष्य काशिबाई रेवणसिद्धा स्वामी आणि शिवमुर्ती राचप्पा स्वामी हे नेहमी असतात. सिद्धनकेरी गावातील काही लोक पुजापाठ करण्याकरिता गेले असता 'तो मठ आमचा आहे' असं म्हणून स्वामीजी यांच्यासोबत वाद घातला.
advertisement
मात्र, 3 मार्च रोजी रात्री 9 वाजता मठामध्ये खोलीत राचोटेश्वर स्वामीजी झोपण्याकरिता जात असताना आरोपींनी मठामधील सीसीटीव्हीची तोडफोड केली. त्यांनी 'मठाचा मीच पुजारी आणि मालक आहे तू बाहेरुन आलेला असून तुझा इथं काहीही संबंध नाही. तू बाहेर ये' असे म्हणून खोलीतून बाहेर ओढत आणून बेदम मारहाण केली. त्यावेळी राचोटेश्वर स्वामीजी यांनी आरोपी राजू लिंगाप्पा कोरे मंजूनाथ सकलेश कोरे आणि त्यांच्या साथीदारांना 'आपलं प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे तुम्ही असे करु नका' असे समजावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी न ऐकता मठातील लाईट बंद करुन स्वामीजींना लोखंडी गजाने पाठीवर,उजव्या खांद्यावर, दोन्ही मांड्यावर मारुन गंभीर जखमी केलं. या प्रकरणी ाचोटेश्वर स्वामी यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे ६ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
view commentsLocation :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
March 05, 2025 6:46 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'मठाचा मीच पुजारी आणि मालक' म्हणत लिंगायत समाजाच्या धर्मगुरूला मठातच अमानुष मारहाण, पंढरपूरमधील घटना


