मुलीची छेड काढल्याचा संशय, नातेवाईकांकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; तरूणाचा अंत
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मुलीच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी संबंधित तरुणाला बेदम मारहाण केली.
बब्बू शेख, प्रतिनिधी
नाशिक : लासलगाव रेल्वे स्थानक परिसरात मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संतापाचे वातावरण पसरले आहे. मृत तरुणाचे नाव कुंदन चावरिया असे असून, त्याचा दुर्दैवी अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने मुलीची छेड काढल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी संबंधित तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कुंदन चावरियाला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लासलगाव रेल्वे स्थानक परिसरात मोठी गर्दी झाली व तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
advertisement
तीन आरोपींना अटक
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मनमाड रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकूण पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित दोन आरोपी सध्या फरार असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
advertisement
उद्या लासलगाव बंदची हाक
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मयत तरुणाच्या नातेवाईकांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले फरार आरोपीना तातडीने अटक करण्यात यावी यासाठी उद्या लासलगाव बंदची हाक देण्यात आली आहे
या प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले असून, फरार आरोपींना लवकरच ताब्यात घेण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. कुंदन चावरियाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात शोककळा पसरली असून, या घटनेची चर्चा संपूर्ण नाशिक जिल्ह्यात होत आहे. सध्या पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
September 18, 2025 3:56 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
मुलीची छेड काढल्याचा संशय, नातेवाईकांकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; तरूणाचा अंत