हत्या की अपघात! अखेर झुबीन गर्गच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलंच, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Zubeen Garg Death Reason : आता सिंगापूर पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारावर झुबीन गर्ग यांच्या मृत्यूच्या रहस्यावरून पडदा पाडला आहे.
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या निधनाने संपूर्ण देशात आणि विशेषतः आसाममध्ये शोककळा पसरली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या मृत्यूभोवती असलेलं गूढ कायम होतं. सुरुवातीला त्यांचा मृत्यू स्कूबा डायव्हिंगमध्ये बुडून झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, यावर भारतात विश्वास नव्हता, कारण झुबीन अनेकदा स्कूबा डायव्हिंग करत असत. अखेर आता सिंगापूर पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारावर झुबीन यांच्या मृत्यूच्या रहस्यावरून पडदा पाडला आहे.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलं मृत्यूचं खरं कारण
सिंगापूर पोलीस दलाने ‘द स्ट्रेट्स टाईम्स’ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी भारतीय उच्चायोगाला ऑटोप्सी रिपोर्टची कॉपी सुपूर्द केली आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा क्रिमिनल हस्तक्षेप किंवा हत्या होण्याची शक्यता स्पष्टपणे नाकारली आहे. याचा अर्थ, झुबीन गर्ग यांचा मृत्यू हा बुडून झालेल्या अपघातामुळेच झाला असल्याचं सिद्ध झालं आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५२ वर्षीय झुबीन यांना १९ सप्टेंबर रोजी सेंट जॉन्स बेटाजवळच्या पाण्यातून बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना तातडीने सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण त्याच दिवशी त्यांचं निधन झालं.
लाइफ जॅकेट काढून मारली होती पाण्यात उडी
झुबीन गर्ग १९ सप्टेंबर रोजी एका यॉटवर काही मित्रांसोबत होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ते लाइफ जॅकेट घालून पाण्यात उडी मारताना दिसले होते. मात्र, नंतर त्यांनी ते जॅकेट काढून पुन्हा पाण्यात उडी मारली आणि हा अपघात घडला.
advertisement
झुबीन सिंगापूरमध्ये ‘नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हल’साठी गेले होते. त्यांच्या अचानक निधनामुळे तीन दिवस चालणारा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता आणि संपूर्ण आसाममध्ये तीन दिवसांचा बंद पाळण्यात आला होता.
मॅनेजर आणि आयोजकांवर खुनाचा गुन्हा दाखल
सिंगापूरमधील डेथ सर्टिफिकेटमध्येही मृत्यूचं कारण ‘बुडणे’ हेच नमूद करण्यात आलं आहे. मात्र, या प्रकरणाचे गूढ पूर्णपणे संपले नसून, आसाम पोलिसांनी झुबीनचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि फेस्टिव्हलचे आयोजक श्यामकानु महंता यांना दिल्लीतून अटक केली आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाने मृत्यूला कारण ठरल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 3:11 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
हत्या की अपघात! अखेर झुबीन गर्गच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलंच, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा