डायबिटीजच्या रुग्णांसाठी AC धोक्याचा! ब्रेन स्ट्रोक येण्याची शक्यता
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
नेकजणांनी पावसाची वाट पाहून पाहून शेवटी कूलर, एसी खरेदी केलाच. पण तुम्हाला माहितीये का, जास्त वेळ एसीत राहणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.
रजत भट्ट, प्रतिनिधी
गोरखपूर : यंदाच्या उकाड्यानं जीव अगदी हैराण केला, कधी एकदा पावसाळा सुरू होतोय आणि जीवाला गारवा मिळतोय असं झालंय नुसतं. अनेकजणांनी पावसाची वाट पाहून पाहून शेवटी कूलर, एसी खरेदी केलाच. पण तुम्हाला माहितीये का, जास्त वेळ एसीत राहणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. असं आम्ही नाही, तर खुद्द आरोग्यतज्ज्ञ सांगतात.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लडप्रेशर आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी एसीची हवा धोकादायक ठरू शकते. या व्यक्ती एसीच्या वातावरणातून अचानक उन्हात गेल्यास त्यांना ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो किंवा त्यांच्या शरिरावर लकवा जाऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्यावी.
advertisement
डॉक्टर आशुतोष दुबे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात, ब्लडप्रेशरचे रुग्ण जेव्हा एसीच्या वातावरणात असतात तेव्हा त्यांच्या नसा आकडतात. त्यानंतर जेव्हा ते अचानक उन्हात जातात तेव्हा त्यांच्या नसा पसरतात आणि रक्त प्रवाह जलद होतो. याचा थेट परिणाम मेंदूच्या नसांवर होतो. म्हणजेच मेंदूला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. एकूणच संपूर्ण शरिराच्या तापमानात संतुलन निर्माण न झाल्यानं ब्रेन स्ट्रोकचा धोका निर्माण होतो.
advertisement
तर, मधुमेहाच्या रुग्णांचं रक्त जाड होतं. उन्हाळ्यात त्यांच्या नसा पसरतात. एसीच्या वातावरणात बसल्यास किंवा थंडगार पाण्याने आंघोळ केल्यास त्यांचं रक्त जाडसर असल्यामुळे नसा आकडल्यास मेंदूच्या काही भागात रक्त पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात. यामुळे इस्केमिक स्ट्रोक म्हणजेच लकवा जाण्याचा धोका वाढतो, ज्याचा थेट परिणाम हृदयावरही होऊ शकतो.
advertisement
एसीची हवा आणि उन्हाचा सर्वाधिक परिणाम ब्लडप्रेशर आणि मधुमेहाच्या रुग्णांवर होतो, त्यांच्यासाठी तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणूनच या व्यक्तींनी एसीमधून थेट कडक उन्हात जाऊ नये. त्यापूर्वी 5 मिनिटं शरिराचं तापमान सामान्य होऊ द्यावं, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
Gorakhpur,Uttar Pradesh
First Published :
June 05, 2024 7:30 PM IST