ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा कृतिशील कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
बाबा आढाव यांच्या निधनाने परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि पुरोगामी चळवळीची फार मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
पुणे : महात्मा फुले यांचा सत्यशोधकी विचार पुढे घेणारा जाणारे कृतिशील लढवय्ये कार्यकर्ते, ज्येष्ठ समाज सेवक बाबा आढाव यांचे निधन झाले आहे. पूना हॉस्पिटलमध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी बाबा आढाव यांनी अखेरचा श्वास घेतला. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे वयाच्या ९५ व्या वर्षांपर्यंत त्यांनी सभा संमेलने, आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवला. त्यांच्या निधनाने परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि पुरोगामी चळवळीची फार मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या उपचारांना ते प्रतिसाद देत होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मात्र सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालविल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
पुरोगामी चळवळीचा अर्ध्वयू हरपला
बाबा आढाव यांची ओळख ही कष्टकऱ्यांचे नेते अशी शेवटपर्यंत राहिली. हमाल पंचायत संघटनेची स्थापना करून नाही रे वर्गासाठी ते अखेपर्यंत लढले. श्रमिकांच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी नेहमीच आवाज उठवला. रिक्षा संघटना, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी केलेले काम, कष्टकऱ्यांसाठी सुरू केलेली 'कष्टाची भाकरी' केंद्र, जातीय भेदभावाला छेद देण्यासाठी एक गाव एक पाणवठा चळवळ, अशी अनेक चळवळींमधून त्यांनी फार मोठे काम केले. अनेक पुरोगामी चळवळींमध्ये त्यांनी सक्रीयपणे सहभाग नोंदवला.
advertisement
वयाच्या ९४ व्या वर्षी ईव्हीएमविरोधात आंदोलन
महात्मा फुले यांच्या विचारांवर बाबांची खूपच श्रद्धा होती. सभा संमेलनामधील भाषणांमधून महात्मा फुले यांचे सत्यशोधकी विचार ते तरुणांपुढे मांडत. महात्मा फुले यांनी अखंड वयाच्या नव्वदीतही बाबा त्यांच्या मंजूळ आवाजात म्हणत असत. जिथे जिथे विषमता असे, अन्याय होत असे तिथे बाबा जायचे. समाजातील नाही रे वर्गासाठी बाबा आंदोलने, उपोषण सत्याग्रह करायचे. नवाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडून लोकशाहीची थट्टा होत असल्याचे सांगत सरकारविरोधात एल्गार पुकारला. त्यांच्या आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली. अनेक पक्षांचे नेते त्यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले.
advertisement
सुप्रिया सुळे यांचं भावुक ट्विट
आदरणीय डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. बाबा, माझ्यासह अनेकांसाठी प्रेरणास्रोत होते. त्यांनी शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा, सत्यशोधकी विचारांचा मार्ग अधिक प्रशस्त केला. या विचारांची शिदोरी बाबांनी आम्हा सर्वांच्या ओंजळीत भरभरुन टाकली. ते अखेरच्या क्षणापर्यंत अगदी आजारपणातही जनतेच्या हितासाठी विशेषतः हमाल, रिक्षाचालक, कामगार, कष्टकरी आणि वंचित समूहाच्या उत्थानासाठी कार्यरत होते. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करीत होते. या सर्वांसाठी बाबा आढाव हे मोठा आधार होते. त्यांच्या जाण्यामुळे आज सामाजिक चळवळींच्या अवकाशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने देश एका वैचारिक, सत्वशील, व्रतस्थ आणि अखंड सेवाव्रती नेतृत्वाला मुकला. या कठीण प्रसंगात आम्ही सर्वजण आढाव कुटुंबियांसोबत आहोत
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 08, 2025 9:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा कृतिशील कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड


