BMC Elections : भाजपच्या सर्वेने शिंदे गटाची धाकधूक वाढली, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी मोठी उलथापालथ?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Shiv Sena BJP BMC Elections : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. पक्षाकडून आगामी निवडणुकांसाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. भाजपने मुंबई महापालिकेसाठी केलेले सर्वेक्षण पक्षाच्या नेत्यांकडे पोहचले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपकडून सर्वेक्षणत करण्यात येत असताना दुसरीकडे मात्र, शिवसेना शिंदे गटाची चिंता वाढली आहे. मुंबई महापालिकेसाठी शिंदे गटाने सुरू केलेल्या तयारीला धक्का बसण्याची शक्यता आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानंतर आता युतीतील जागावाटपाचे गणित पेचात अडकण्याची चिन्हं आहेत. भाजपने आपल्या सर्वेक्षणातून 150 हून अधिक जागांवर लढण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत अस्वस्थता वाढली असल्याचे म्हटले जात आहे.
शिवसेना शिंदे गटाची तयारी...
मुंबई महानगरपालिकेत एकूण 227 जागा आहेत. त्यापैकी शिवसेना शिंदे गट 107 जागांवर आपले उमेदवार लढवण्याच्या तयारीत असल्याचे आतापर्यंत संकेत देत आहे. भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांची शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबई दौऱ्याच्या वेळी भेट घेतली होती. या बैठकीत शिंदे यांनी आपल्याकडे 107 उमेदवार तयार असल्याचे सांगितले. यामध्ये ठाकरे गटासह काँग्रेस व इतर पक्षांचे नगरसेवकांचा समावेश आहे.
advertisement
शिवसेना शिंदे गटाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांना गळाला लावले. मागील निवडणुकीत विजयी झालेले जवळपास 50 नगरसेवक शिंदे यांनी आपल्या गळाला लावले. त्याशिवाय काँग्रेस आणि इतर पक्षांचेही नगरसेवक आपल्याकडे खेचले आहेत.
भाजप 150 जागा लढवणार?
भाजपच्या सर्वेक्षणानुसार मुंबईतील जनमत भाजपच्या बाजूने असल्याचे दिसून येत असून, त्यामुळे पक्ष स्वबळावर सत्ता स्थापनेस उत्सुक असल्याचं भाजपमधील सूत्रांकडून समजते. सर्वेक्षणानुसार, भाजपने 150 आणि त्याहून अधिक जागांवर निवडणूक लढवल्यास त्यांना मुंबई महापालिकेवरील स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची संधी असणार आहे. मात्र, भाजपने 150 जागांवर उमेदवार उभे केले तर शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेला किती जागा येणार हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. मुंबईत अजित पवार गटाची ताकद फार कमी असल्याने अजित पवार गट महायुतीमध्ये कमीत कमी जागांवर निवडणूक लढवण्यास तयार होऊ शकतो. मात्र, शिंदे गटाची मोठी अडचण होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 04, 2025 2:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Elections : भाजपच्या सर्वेने शिंदे गटाची धाकधूक वाढली, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी मोठी उलथापालथ?