शेतकऱ्यांची गुर गेली, आता पोर उघड्यावर आली; मराठवाड्यातील ओल्या दुष्काळाचा फटका कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
मराठवाडा हा भाग नेहमीच दुष्काळी म्हणून ओळखला जातो. पण यंदा परिस्थिती पूर्णपणे उलटी झाली आहे. दुष्काळ नव्हे, तर ओला दुष्काळ या नव्या संकटाने शेतकऱ्यांचे मोलाचे पीक उद्ध्वस्त केले आहे.
पुणे: मराठवाडा हा भाग नेहमीच दुष्काळी म्हणून ओळखला जातो. पण यंदा परिस्थिती पूर्णपणे उलटी झाली आहे. दुष्काळ नव्हे, तर ओला दुष्काळ या नव्या संकटाने शेतकऱ्यांचे मोलाचे पीक उद्ध्वस्त केले आहे. सततच्या पावसाने सोयाबीन, मूग, उडीद, कापूस यासारखी पिके आडवी झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांच्या घरचा आर्थिक कणा पूर्णपणे मोडला आहे. या संकटाचा फटका फक्त शेतकऱ्यांनाच नाही, तर त्यांच्या शहरात शिक्षणासाठी आलेल्या मुलांनाही बसला आहे.
पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या अनेक मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसमोर सध्या जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. पूर्वी घरून जेवढे पैसे येत होते तेवढे आता येत नाहीत. तीन हजार रुपयांत महिन्याचा खर्च भागवायचा असतो, पण दोन हजार रुपये फक्त रूम भाड्यासाठी जातात. जेवण, वीज, मेस, प्रवास हे सगळं वेगळं! असं सांगताना लातूरहून आलेला विद्यार्थी राहुल पाटील याच्या डोळ्यात अश्रू दाटलेले दिसतात. घरी जाण्याची परिस्थिती नाही, कारण घरात काहीच उरलेलं नाही. आई-वडील मजुरी करून कसाबसा संसार चालवत आहेत.
advertisement
सोयाबीनचं पीक गेलं, त्यामुळे दिवाळीच होणार नाही. आधी घरचं पोट कापून आई-वडील पैसे पाठवायचे, पण आता त्यांनाही हातात काही नाही. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग पुण्यात शिक्षण घेतो. त्यात अनेकजण शेतकरी कुटुंबांतील आहेत. पुण्यातील स्वस्त निवास, मेस, लायब्ररी यावर ते शिक्षण घेत असतात. मात्र, या वर्षीच्या ओल्या दुष्काळामुळे घरच्यांकडून पैसे मिळणे अवघड झाले आहे. यामुळे विद्यार्थी अर्धवेळ नोकऱ्या करत आहेत, काहीजण शिक्षण सोडायच्या विचारात आहेत. दिवसातून एक वेळेस तरी नीट जेवण मिळावं, एवढंच आता स्वप्न आहे. शेतीचं नुकसान झालंय, पण त्या परिणामांची साखळी शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे.
advertisement
शासनाने विद्यार्थ्यांसाठी विशेष आर्थिक मदत, शिष्यवृत्ती किंवा निवास योजनांची तरतूद केली पाहिजे. कारण आज हे विद्यार्थीच उद्याचे शेतकरी, अधिकारी, शिक्षक होणार आहेत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. सध्या पुण्यातील अनेक कॉलेजांमध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी मित्रपरिवार, एनजीओ आणि सामाजिक संस्थांनी मोफत जेवण किंवा राहण्याची तात्पुरती सोय उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील गुरं गेली, पीक गेलं, आणि आता त्यांच्या लेकरांना शहरात शिक्षण टिकवणं अवघड झालंय. हे संकट फक्त आर्थिक नाही, तर मानसिक ताणाचंही आहे. शिक्षणासाठी झगडणाऱ्या या विद्यार्थ्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. अन्यथा ओला दुष्काळ फक्त शेतांनाच नाही, तर स्वप्नांनाही भस्मसात करून टाकेल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 07, 2025 7:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शेतकऱ्यांची गुर गेली, आता पोर उघड्यावर आली; मराठवाड्यातील ओल्या दुष्काळाचा फटका कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही