Jayant Narlikar Dies : एका पर्वाचा अंत! ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचे निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Jaayant Narlikar Passed Away : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले.
पुणे: प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञानविश्वावर शोककळा पसरली आहे. सहजसोप्या भाषेत वैज्ञानिक गोष्टी उलगडून सांगत असे. जयंत नारळीकर यांनी विज्ञानावर लिहिलेली अनेक पुस्तकेही गाजली.
झोपेतच घेतला अखेरचा श्वास
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. नारळीकर झोपेतच शांतपणे अनंतात विलीन झाले. त्यांना कोणतीही दीर्घ आजारपण नव्हते, मात्र वयोमानानुसार प्रकृतीत काहीसा खालावलेला होता. त्यांच्या निधनामुळे वैज्ञानिक, साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी तारा मालवला आहे.
19 जुलै 1938 रोजी कोल्हापूरमध्ये जयंत नारळीकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे गणितज्ञ आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून काम केले होते आणि आई सुमती नारळीकर संस्कृतच्या अभ्यासक होत्या. त्यांच्या पत्नी गणितज्ञ मंगला नारळीकर होत्या. त्यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. प्रतिष्ठित सांख्यिकीशास्त्रज्ञ व्ही. एस. हुजुरबाजार हे जयंत नारळीकर यांचे मामा होते.
advertisement
घरात लाभलेल्या या वैज्ञानिक अभ्यासाचा वारसा त्यांनी पुढे समर्थपणे चालवला आणि आपली वेगळी छाप सोडली.
१९६४ मध्ये खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांनी १९७२ पर्यंत किंग्ज कॉलेजमध्ये फेलो म्हणून काम केले. १९६६ मध्ये, फ्रेड हॉयल यांनी केंब्रिजमध्ये सैद्धांतिक खगोलशास्त्र संस्था स्थापन केली आणि नारळीकर यांनी १९६६-७२ दरम्यान संस्थेचे संस्थापक कर्मचारी सदस्य म्हणून काम केले. १९७२ मध्ये, नारळीकर यांनी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) येथे प्राध्यापकपद स्वीकारले. TIFR मध्ये ते सैद्धांतिक खगोलभौतिकशास्त्र गटाचे प्रभारी होते. १९८८ मध्ये, भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाने पुण्यात इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA) ची स्थापना केली आणि नारळीकर IUCAA चे संस्थापक-संचालक बनले.
advertisement
भारतीय खगोलशास्त्राचे अनमोल रत्न
जयंत नारळीकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी विश्वाच्या उत्पत्तीविषयी ‘steady state theory’ चे समर्थन केले. खगोलशास्त्रातील त्यांच्या संशोधनामुळे त्यांना जगभरात मान्यता मिळाली. प्रसिद्ध ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल यांच्यासोबत त्यांनी अनेक संशोधन प्रकल्पांवर काम केले.
'IUCAA' चे संस्थापक
पुण्यातील 'इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स' (IUCAA) या संस्थेची स्थापना त्यांनी 1988 साली केली आणि त्याचे पहिले संचालक म्हणून कार्यभार सांभाळला. ही संस्था आज भारतातील आघाडीची खगोलशास्त्र संशोधन संस्था म्हणून ओळखली जाते.
advertisement
विज्ञानाचा लोकाभिमुख चेहरा
नारळीकर हे केवळ शास्त्रज्ञ नव्हते, तर एक उत्तम लेखक आणि विज्ञानप्रसारकही होते. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेतून अनेक विज्ञानकथा, लघुनिबंध, पुस्तके लिहिली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
पुरस्कार आणि सन्मान
त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांनी विज्ञानाला केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित न ठेवता ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले.
advertisement
एक युग संपले
जयंत नारळीकर यांच्या निधनामुळे विज्ञान आणि साहित्य क्षेत्रातील एक युग संपले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा भावी पिढ्यांना विज्ञानाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची दिशा देत राहील.
साहित्यातही भरीव योगदान...
जयंत नारळीकर यांनी मराठीत पुस्तकेही लिहीली. त्यांच्या 'चार नगरातले माझे विश्व' या आत्मकथेला 2014 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. नाशिकमध्ये झालेल्या 2021 मधील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नारळीकर यांनी इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये विज्ञानकथा, कादंबऱ्या आणि लघुकथा लिहिल्या आहेत. अंतराळातील भस्मासुर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला,
advertisement
टाइम मशीनची किमया, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 20, 2025 10:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jayant Narlikar Dies : एका पर्वाचा अंत! ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचे निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास