मी जातो आहे पण सोडत नाही, जयंत पाटील यांचे निरोपाचे भाषण, टाळ्यांचा कडकडाट, पवारही गहिवरले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Jayant Patil: राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण बैठकीत जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून निरोपाचे भाषण केले.पक्षाचे अध्यक्ष म्हणून सात वर्षे केलेले काम, त्यादरम्यान आलेले अनुभव भाषणात त्यांनी कथन केले.
मुंबई : माझ्या खांद्यावर पक्षाची जबाबदारी येईल असे वाटले नव्हते पण पवारसाहेबांनी जबाबदारी दिली. सात वर्षात अनेकांनी मला साथ दिली. निवडणूक जिंकलो हरलो. मधल्या काळात पक्ष फुटला होता. पुन्हा पक्षसंघटना उभी केली. आज मी एक पाऊल मागे घेतले आगहे पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतोय पण उदिष्ट अजूनही ठाम आहे, शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार हाच आमचा ध्यास आहे, असे निरोपाच्या भाषणात जयंत पाटील म्हणाले. तसेच मी जातो आहे पण सोडत नाही, असे म्हणत भाजप प्रवेशाच्या चर्चांना त्यांनी तूर्त पूर्ण विराम दिला. त्यांच्या भाषणादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांचे भाषण ऐकून शरद पवार देखील गहिवरले.
राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण बैठकीत जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून निरोपाचे भाषण केले. अतिशय कठीण काळात जयंत पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. प्रदेशाध्यक्ष बदलासंदर्भात पक्षातून मागणी होऊ लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावांवर टर्चा होऊन अखेर शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. खुद्द शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव प्रदेशाध्यक्ष म्हणून जाहीर केले. तत्पूर्वी जयंत पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून सात वर्षे केलेले काम, त्यादरम्यान आलेले अनुभव भाषणात कथन केले.
advertisement
सामान्य घरातील पोरांना काम करण्याची संधी दिली
माझ्या खांद्यावर पक्षाचा जबाबदारी येईल असे वाटले नव्हते पण पवारसाहेबांनी जबाबदारी दिली. सात वर्षात अनेकांनी मला साथ दिली. पक्ष फुटलेला होता. मेहबूब शेख सारखा पोरगा तरूणाचे प्रतिनिधित्व करतो. सक्षणाला युवती अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. सुनिल गव्हाणे सारखा पोरगा विद्यार्थ्यांच्या सेलचा प्रमुख झाला. रूपाली चाकणकर त्यावेळी महिला अध्यक्ष झाल्या. सामान्य घरातील मुलांना शरद पवारांनी पदे दिली. आर आर पाटील यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. तेच चित्र पुढे ठेऊन पवारसाहेबांच्या सूचनेनुसार मी या सगळ्यांच्या नेमणुका केल्या.
advertisement
मी आता बाजूला झालो पाहिजे...
सगळ्या राज्यात जागर निर्माण करण्याचे काम दोन अमोलने केले. अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी राज्यभर फिरले. एक आपल्याकडे आहेत, दुसरे तिकडे गेले. माझी कोणती संघटना नाही, माझे दुसरे कुठले फाऊंडेशन नाही, पक्ष हीच माझी संघटना, मी प्रदेशाध्यक्ष झालो. गेली ३५ वर्षे मी राजकीय जीवनात काम करतो आहे. गेली २६३३ दिवस मी प्रदेशाध्यक्ष आहे. २-३ वर्षांची टर्म असते. साहेबांनी मला वारंवार संधी दिली. पवारसाहेबांनी मला सांगितले तूच अध्यक्ष व्हायला पाहिजे. बरीच वर्ष झाली माझी आता. मी आता बाजूला झालो पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले.
advertisement
मी जातो आहे पण सोडत नाही.....
मी मुख्य सेनापती होतो, सेना अजूनही सज्ज आहे, नव्या युगातही शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार हाच आमचा ध्यास आहे. मी जातो आहे पण सोडत नाही, एक पाऊल मागे घेतलंय पण उदिष्ट अजूनही ठाम आहे... कालही महाराष्ट्रासाठी होतो, आजही आहे, नाव असेल किंवा नसेल पण कामातूनच ओळख मिळेल कारण मी जयंत आहे... असे सांगत भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देऊन पक्षांतर्गत विरोधकांनाही त्यांनी सुनावले.
advertisement
पक्षांतर्गत विरोधकांना रोखठोक उत्तर
माझे सगळे सहकारी गेले आणि मीच फक्त साहेबांबरोबर राहिलो. मी कमी बोलतो. त्यामुळे लोकांना वाटते मी कमी बोलतो. माझ्या विरोधात अनेक कुरघोड्या झाल्या. प्रत्येक गोष्ट प्रसार माध्यमांबरोबर बोललीच पाहिजे असे नाही,अशा शब्दात पक्षांतर्गत विरोधकांना जयंत पाटील यांनी सुनावले.
मी बायकोला परवा म्हणालो की गेल्या सात वर्षात आपण सुट्टी काढली नाही, असे सांगतानाच सात वर्षात अदिती नलावडे, शिवाजीराव गर्जे यांनी केलेल्या मदतीबद्दल जयंत पाटील यांनी त्यांचे आभार मानले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 15, 2025 5:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मी जातो आहे पण सोडत नाही, जयंत पाटील यांचे निरोपाचे भाषण, टाळ्यांचा कडकडाट, पवारही गहिवरले