आव्हाडांच्या विधानावरून राष्ट्रवादीत खडाखडी, माजी मंत्र्याने दिला जीभेला आवर घालण्याचा सल्ला
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
आधी रोहित पवार यांनी अनावश्यक वक्तव्ये टाळायला हवी असं म्हटलं तर आता माजी मंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना पक्षाशी याचा काही संबंध नसल्याचं म्हटलंय.
शिर्डी, 04 डिसेंबर : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. या वादावरून जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादीच्याच नेत्यांनीही सुनावलं आहे. आधी रोहित पवार यांनी अनावश्यक वक्तव्ये टाळायला हवी असं म्हटलं तर आता माजी मंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना पक्षाशी याचा काही संबंध नसल्याचं म्हटलंय. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानानंतर अजित पवार समर्थकांनी त्यांच्या घराबाहेर आरती केल्याचंही समोर आलं आहे. आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजेश टोपे यांनी म्हटलं की, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य वैयक्तिक आहे. बोलण्याचं स्वातंत्र्य असल्याने त्यांनी ते विचार मांडले. पण पक्षाचा व या वक्तव्याचा काही संबंध नाही. सगळ्यात धारदार शस्त्र म्हणजे आपली जीभ आहे. त्यामुळे बोलताना सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे असा सल्लाही टोपे यांनी दिला.
काय म्हणाले रोहित पवार?
‘आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे’, असं रोहित पवार म्हणाले.
advertisement
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
‘राम आपला आहे, राम बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम, तो आमच्या बहुजनांचा आहे. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला जात आहात. आम्ही रामाचा आदर्श पाळतोय आणि मटण खात आहे. हा रामाचा आदर्श आहे, राम शाकाहारी नव्हताच, तो मांसहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस शाकाहारी शोधायला कुठे जाणार?’, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 04, 2024 10:26 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आव्हाडांच्या विधानावरून राष्ट्रवादीत खडाखडी, माजी मंत्र्याने दिला जीभेला आवर घालण्याचा सल्ला