जय बजरंगबली! कोल्हापूरकरांची अनोखी हनुमान भक्ती, थेट डोक्यावर साकारले मारुती, Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
हनुमान जयंतीनिमित्त कोल्हापुरातील सलून व्यवसायिकाने आपल्या सलूनमध्ये काही मुलांच्या डोक्यावर हेअर आर्ट केले आहे. त्यांनी साकारलेले हनुमंताच्या चेहऱ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : दरवर्षी चैत्र शुक्ल पौर्णिमेला संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने हनुमान जयंती साजरी केली जाते. कित्येक भक्तांकडून हनुमान जयंतीला 'हनुमान जन्मोत्सव' म्हणणेच अधिक योग्य ठरेल असे मानले जाते. त्यातच कोल्हापुरातील एका सलूनचालकाने वेगळ्या पद्धतीने आपली हनुमंतावरील भक्ती व्यक्त केली आहे. मुलांच्या डोक्यावर हेअर आर्ट करून त्यांनी हनुमंताचे तीन वेगवेगळ्या भावमुद्रेतील चेहरे कोरले आहेत.
advertisement
कोल्हापुरात भोसलेवाडी येथे राहणाऱ्या संग्राम माटे यांनी 2005 साली सलून व्यवसाय सुरू केला होता. पुढे ते आणि त्यांचे भाऊ योगिराज माटे हे एकत्रच काम करू लागले. सलूनमध्ये आजी-माजी सैनिकांसाठी दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त राबवल्या जाणाऱ्या मोफत केशसेवेच्या उपक्रमामुळे त्यांचे सलून परिसरात प्रसिद्ध आहे. त्यातच आता हनुमान जयंतीनिमित्त त्यांनी आपल्या सलून मध्ये काही मुलांच्या डोक्यावर हेअर आर्ट केले आहे. त्यांनी साकारलेले हनुमंताच्या चेहऱ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
श्री हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून हनुमानाचे हेअर आर्ट केले आहे. हेअर आर्ट करणे ही एक कला आहे. क्रिकेट किंवा फुटबॉल च्या सामन्यांवेळी फॅन्सच्या डोक्यावर अशा प्रकारचे हेयर आर्ट बऱ्याचदा पाहायला मिळते. आपल्या महापुरुषांचे किंवा देवतांचे हे असे हेअर आर्ट करण्यासाठी कराडच्या कैलास काशीद यांच्याकडे जाऊन प्रशिक्षण घेतले असल्याचे सलून मालक योगीराज माटे यांनी सांगितले.
advertisement
कसे काढले हेअर आर्ट?
हे अशा पद्धतीचे एका व्यक्तीच्या डोक्यावर हेअर आर्ट करण्यासाठी साधारण दीड ते दोन तास लागतात. घनश्याम, केदार आणि पराग अशा तिघा मुलांच्या डोक्यावर हे हनुमानाचे हेअर आर्ट सध्या करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येकाच्या डोक्यावर वेगळ्या भावमुद्रेत असणाऱ्या हनुमंताचा चेहरा कोरण्यात आला आहे. त्यामध्ये एकाच्या डोक्यावर शांत मुद्रेतील हनुमान, दुसऱ्याच्या डोक्यावर संयमी हनुमान आणि तिसऱ्या मुलाच्या डोक्यावर उग्र चेहऱ्याचा हनुमान कोरण्यात आला आहे. अशा पद्धतीचे हेअर आर्ट करण्यासाठी प्रति व्यक्ती साधारण 500 ते 700 रुपये खर्च येतो, असेही योगीराज यांनी सांगितले.
advertisement
याआधीही केले होते वेगळे हेअर आर्ट
योगीराज यांनी या आधी देखील अशा प्रकारचे हेअर आर्ट मुलांच्या डोक्यावर केले होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, लहान मुलांच्या कार्टून मधील आवडते पात्र असणारा छोटा भीम यांचे चेहरे त्यांनी घरातीलच मुलांच्या डोक्यावर कोरले होते.
advertisement
दरम्यान, योगीराज हे सैनिक क्षेत्राची संबंधित व्यक्तींना देत असलेल्या मोफत केशसेवेमुळे परिचित आहेतच. मात्र आता एक वेगळे हेअर आर्टिस्ट म्हणून देखील त्यांची ओळख सर्वत्र होऊ लागली आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
April 23, 2024 7:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
जय बजरंगबली! कोल्हापूरकरांची अनोखी हनुमान भक्ती, थेट डोक्यावर साकारले मारुती, Video