एका पॉझिटिव्ह महिलेची गोष्ट, स्वत: बाधित असूनही बनल्या HIV ग्रस्तांच्या आधारवड, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
सुषमा ताईंनी 2011 साली एचआयव्ही बाधितांसाठी जाणीव फाउंडेशन नावाची संस्था सुरु केली. अशा प्रकारची ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच संस्था ठरली होती.
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : समाजाने समाजातीलच एखाद्या घटकाला वाळीत टाकले, तर त्या घटकाचे जगणेच अवघड होऊन जाते. मात्र त्याही परिस्थितीत आपल्या सारख्याच घटकांचा विचार करून जिद्दीने झुंजत लढत कोल्हापुरात एक महिला उभी राहिली. स्वतःशी आणि समाजातील विचारांशी लढा देत समाजातील निराधारांची ती आधारवड बनली. स्वतःही एचआयव्ही या दुर्धर आजाराने ग्रस्त असून देखील ती अशाच गरजू आणि निराधार एचआयव्ही बाधितांची ती आधारवड बनली आहे. त्याच कोल्हापुरातील कर्तृत्ववान अशा सुषमा बटकडली ताईंची ही कहाणी आहे.
advertisement
खरंतर एचआयव्ही या आजाराचे नावही उघडपणे अजून देखील घेतले जात नाही. त्यात अशा दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या बाधितांचे आयुष्य बऱ्याचदा एकाकीच असते. सुषमा बटकडली या त्यापैकीच एक आहेत. सध्या करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या सुषमा या मूळच्या कर्नाटकातील आहेत. त्यांनी सुरू केलेल्या जाणीव फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून त्या अनेक एचआयव्ही बाधितांसाठी कार्य करत आहेत. नुकतीच त्यांनी वयाची पर्वा न करता शिवाजी विद्यापीठातून मास्टर ऑफ सोशल वर्कची पदवीही मिळवली आहे.
advertisement
काय आहे सुषमाताईंची कहाणी?
2000 साली सुषमा ताईंनी लग्न करून सुखी संसाराला सुरुवात केली होती. मात्र लग्नानंतर काही वर्षातच त्यांना पतीकडून एचआयव्ही आजार जडला. त्यावेळी या आजाराने ग्रस्त असणाऱ्याला सहसा कोणीही जवळ घेत नसत. बिकट परिस्थितीत देखील त्यांनी त्यांचा संसार सुरू ठेवला. पुढे आजारपणात 2009 साली त्यांच्या पतीचे निधन झाले आणि सुषमाताई एकट्या पडल्या. त्यावेळी पतीला स्मशानभूमीत घेऊन जाण्यासाठीही कोणी पुढे सरसावले नव्हते. इतक्या वाईट परिस्थितीचा त्यांनी एकटीने सामना केला.
advertisement
एकट्या पडलेल्या सुषमा ताईंना समाजाचे काटे अजूनच जास्त टोचू लागले. इतके की कित्येकदा आयुष्य संपवून टाकण्याचे विचार देखील त्यांच्या मनी येऊन गेले. मात्र या परिस्थितीत देखील त्यांनी लढायचा निर्धार केला. आपल्यावर जशी परिस्थिती आली आहे तशीच समाजातील अशा घटकांवर आली असणार हा विचार त्यांनी केला. अशा निराधार आणि गरजू लोकांच्या साठीच आपला आयुष्य घालवायचं, असं ठरवून त्या 2010 साली कर्नाटकातून कोल्हापुरात आल्या.
advertisement
सुरू केली जिल्ह्यातली पहिली संस्था
ना कुणाची साथ, ना कुणाची ओळख, असे असताना देखील आपल्या नशिबावर विश्वास ठेवून त्यांनी समाजातील चुकीच्या विचारसरणी विरोधात लढा सुरू ठेवला. यातूनच सुषमा ताईंनी 2011 साली एचआयव्ही बाधितांसाठी जाणीव फाउंडेशन नावाची संस्था सुरु केली. अशा प्रकारची ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच संस्था ठरली होती. याच संस्थेच्या माध्यमातून असतागायत सुषमाताई अनाथ निराधार याच्यावर ग्रस्त मुले आणि महिला यांच्यासाठी आधारवड बनलेल्या आहेत.
advertisement
काय करते संस्था?
जाणीव फाउंडेशन ही संस्था सर्वात महत्त्वाचे म्हणजे एचआयव्हीग्रस्त निराधार आणि गरजूंना एकत्रित करण्याचे काम करते. गुप्तरोगाबद्दल चर्चा करण्यासाठी किंवा समुपदेशनासाठी, औषधोपचार, कायदेशीर हक्क, योजनांची माहिती बाधितांना मिळवून देणे, कोर्टात मोफत कायदेशीर मदत मिळवून देणे अशा अनेक कारणांसाठी ही संस्था कार्य करते, अशी माहिती सुषमा ताईंनी दिली आहे.
दरम्यान, कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी मधील रिलायन्स मॉलच्या पाठीमागे महानगरपालिकेच्या एका गाळ्यात या जाणीव फौंडेशनचे कार्यालय आहे. समाजातील निराधार आणि गरजू एचआयव्ही बाधितांना सहाय्य करणाऱ्या या संस्थेला सध्या सढळ हाताने मदत करून सुषमा ताईंचे हात बळकट करण्याची गरज आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
March 03, 2024 12:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
एका पॉझिटिव्ह महिलेची गोष्ट, स्वत: बाधित असूनही बनल्या HIV ग्रस्तांच्या आधारवड, Video