लातूरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, अज्ञाताकडून बसवर दगडफेक
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
लातूर जिल्ह्यात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळत आहे. अज्ञात व्यक्तीकडून बसवर दगडफेक करण्यात आली आहे.
लातूर, 3 सप्टेंबर, सचिन सोळुंके : दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. यावरून राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे. लातूर जिल्ह्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळत आहे. शिरुर ताजंब येथे अज्ञात व्यक्तीकडून बसवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीमध्ये बसची समोरची काच फुटली असून, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं संबंधित व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
राज्याच्या विविध भागांमध्ये आंदोलन
जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू होतं. मात्र उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर आंदोलक आक्रमक झाले आहेत. आजही या घटनेचे राज्यातील अनेक भागात पडसाद उमटत असल्याचं पहायला मिळत आहे.
जालन्यात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे पडसाद नाशिक जिल्ह्यात उमटले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी नाशिक ग्रामीणमध्ये बंद पाळण्यात आला आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी सटाण्यात मालेगाव -सुरत महामार्गावर रस्ता रोको केला. तसेच नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन देखील करण्यात आले. रस्ता रोको आंदोलनामुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
advertisement
बुलढाण्यातही लाठीचार्जच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज बुलढाण्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत. मात्र दुसरीकडे आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. जिल्ह्यातील फुलंब्री, पैठण, गंगापूर तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या बंदला व्यापाऱ्यांसह, मुस्लिम बांधवांचा देखील मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय. मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी जिल्हाबंदची हाक दिली होती.
view commentsLocation :
Latur,Latur,Maharashtra
First Published :
September 03, 2023 2:35 PM IST


