बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मोफत सहलीचे आयोजन, मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Dr Babasaheb Ambedkar Jayanti: महाराष्ट्र शासन टूर सर्कीट अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून, त्यांच्या महान कार्याचे आणि जीवनाचे महत्त्व समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे दि. १४ व १५ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. टूर सर्कीट अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या स्थळांचा समावेश असून, या सहली नागरिक, पर्यटकांसाठी विनाशुल्क आयोजित करण्यात येत आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
सहलीत कोणकोणत्या ठिकाणांचा समावेश?
डॉ. बाबासाहेब आंबडेकर टूर सर्कीटमध्ये मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी, राजगृह, प्रिटींग प्रेस, परळ येथील बी.आय.टी चाळ, वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे. तर नाशिकमधील येवले मुक्तीभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या स्थळांचा समावेश आहे. तर नागपूर येथील दिक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि नागलोक विहार या स्थळांचा समावेश आहे.सदर टूर सर्कीटच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आणि त्यांच्या सामाजिक समता, शिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानाचे महत्त्व सर्व सामान्य नागरिक व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे. सर्व नागरिक/ पर्यटकांना या सहलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
advertisement
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पर्यटन संचालनालयाने आयोजित केलेले टूर सर्किट हे सामाजिक समता आणि ज्ञानप्रसाराचे प्रतीक आहे. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. या टूर सर्किटद्वारे त्यांच्या जीवनाशी निगडीत स्थळांना भेट देऊन पर्यटकांना त्यांचा समृद्ध वारसा समजण्याची संधी मिळेल. महाराष्ट्रातील चैत्यभूमी, दीक्षाभूमी, मुक्ती भूमी यांसारख्या ठिकाणांचा समावेश या उपक्रमात आहे, ज्यामुळे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळेल.
advertisement
हा उपक्रम बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीच्या संदेशाला पुढे नेण्यासाठी महत्त्वाचा आहे. पर्यटन विभागाचा हा प्रयत्न स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देईल आणि बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवेल. या टूर सर्किटला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे. पर्यटन क्षेत्रातून सामाजिक जागरूकता वाढवण्याचा हा अनोखा प्रयत्न यशस्वी होईल, असा आशावाद शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 12, 2025 5:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मोफत सहलीचे आयोजन, मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा