2 महिने तिचा मृतदेह घरात होता, कुणाल थंड डोक्याने गावात फिरत होता, सिंधुदुर्गातील क्राईम पेट्रोल स्टाईल घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
पोलिसांनी कुणालसह घटनास्थळी जात खात्री केली असता अत्यंत निर्जनस्थळी असलेल्या त्या बंद घरात त्या मुलीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला.
प्रसाद पाताडे, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १ ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गावातील २३ वर्षीय तरुणाने एका निर्जनस्थळी या मुलीचा गळा आवळून खून केल्याचं दोन महिन्यानंतर उघड झालं आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कोर्टाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाार, कुडाळ तालुक्यातील घावनळे येथून २ ऑगस्ट २०२५ पासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून झाला आहे. गोठोस मांडशेतवाडी इथं राहणारा कुणाल कृष्णा कुंभार (वय २३) यानेच वाडोस-बाटमाचा चाळा येथून १०० मीटर अंतरावर असलेल्या एका निर्जनस्थळी गळा आवळून मुलीचा खून केल्याचं कबुल केलं आहे.
अल्पवयीन मुलगी २ ऑगस्ट २०२५ पासून घावनळे गावातून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली होती. तेव्हापासून तिचा शोध सुरू होता. ती अल्पवयीन असल्याने कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून कुडाळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. एका महिन्यापासून पोलीस आणि नातेवाईक तिचा शोध घेत होते. माध्यमांतूनही मुलीचा फोटो प्रसिद्ध करून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेंद्र मगदूम यांची गुन्हा तपासासाठी स्थानिक पातळीवर विशेष पोलीस पथक स्थापन केलं होतं.
advertisement
भेटायला बोलावून गळा आवळला
तब्बल एक महिन्यानंतर पोलिसांच्या तपासात या मुलीचा खून केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्या मुलीशी गोठोस-मांडशेतवाडी येथील कुणाल कृष्णा कुंभार याचं प्रेम होतं. मात्र ती त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देत नव्हती. पण मैत्री होती. पण ती प्रेमाला प्रतिसाद देत नसल्याने तिला संपवायचा विचार कुणालच्या डोक्यात आला. त्याने तिला भेटायला बोलावलं. २ ऑगस्ट रोजी ती सावंतवाडी येथे कॉलेजमध्ये गेली होती. तिथून ती आंबेरी तिठा इथं आली. त्यांनतर कुणाल तीला मोटर सायकलवरून वाडोस-बाटमाचा चाळा येथून १०० मीटर अंतरावर असलेल्या एका निर्जनस्थळी बंद घराजवळ घेऊन गेला. तिथे त्याने गळा आवळून तिला ठार केलं आणि तिचा मृतदेह त्या घराच्या खिडकीतून आत टाकला. नंतर स्वतः त्या खिडकीतून आता जाऊन मृतदेह नीट झाकून ठेवला.
advertisement
कुणाल पोलिसांसमोर काहीच बोलला नाही
दरम्यान, ती मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांनी कुडाळ पोलिसात खबर दिली. कुडाळ पोलिसांनी सुद्धा तिचा शोध घेण्याच्या दृष्टीने अनेक बाजूनी तपास सुरू केला. तिचे मित्र कोण याचा शोध घेतला. तिच्या मोबाईलचे लोकेशन शोधण्याचाही प्रयत्न झाला. दरम्यान कुणाल याला सुद्धा कुडाळ पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं. त्याच्याकडे सुद्धा चौकशी करण्यात आली. पण कुणाल हा एवढा निर्ढावलेला निघाला की 'तो मी नव्हेच' असंच त्याचं वागणं होतं.
advertisement
शेवटच्या फोन कॉलमुळे कुणाल सापडला
जेव्हा त्या मुलीच्या फोनचे सीडीआर तपासण्यात आले तेव्हा तिच्या फोनवर शेवटचा कॉल कुणालचा होता. त्यावरून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याला तीन चार वेळा चौकशीसाठी बोलावलं पण त्याने काहीच कळू दिलं नाही. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच कुणाल पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने आपणच तिला गळा आवळून मारल्याची कबुली दिली.
advertisement
अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला
पोलिसांनी कुणालसह घटनास्थळी जात खात्री केली असता अत्यंत निर्जनस्थळी असलेल्या त्या बंद घरात त्या मुलीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. मृतदेहावरील कपडे आहेत तसेच होते. त्यावरून मुलीच्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यांनतर शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथे तो मृतदेह पाठवण्यात आला आहे.
advertisement
कुणालला ५ दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान मंगळवारी सायंकाळी कुणाल कृष्णा कुंभार याला अटक करण्यात आली. आज बुधवारी दुपारी त्याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयात सरकारी वकील श्रीमती मीराजे यांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. पण कुणाल कुंभार याच्या वतीने ऍड. विवेक मांडकुलकर यांनी बाजू मांडताना पोलिसांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची केलेली मागणी योग्य नसल्याचा मुद्दा मांडला. केवळ फोन रेकॉर्ड वरून आणि संशयित आरोपीने कबुली दिली म्हणून सात दिवसांची पोलीस कोठडी देणे योग्य नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिले. अखेर कोर्टाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून संशियत आरोपी कुणाल कृष्णा कुंभार याला रविवार ५ ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
हत्येचं खरं कारण काय?
दरम्यान, ही हत्या करण्यामागे नेमके कारण काय असा प्रश्न विचारला असता, पोलीस उप अधीक्षक कांबळे यांनी त्याचा तपास सुरू आहे. नक्की प्रेम प्रकरणातून की आणखी कोणत्या कारणामुळे खून झाला हे आता सांगणे शक्य नाही. तपासात या बाबी उघड होतील असे सांगितलं. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उप विभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस उपनिरीक्षक सावर्डे, पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर, कृष्णा परुळेकर, प्रमोद काळसेकर, संजय कदम, योगेश वेंगुर्लेकर, महेश भोई, सखाराम भोई, आनंद पालव, महेश जळवी, रुपेश गुरव यांनी केली.
Location :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
October 01, 2025 9:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
2 महिने तिचा मृतदेह घरात होता, कुणाल थंड डोक्याने गावात फिरत होता, सिंधुदुर्गातील क्राईम पेट्रोल स्टाईल घटना