NIA Raids : एनआयएची 5 राज्यांत छापेमारी, महाराष्ट्रातून काहीजण ताब्यात, दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
NIA Raids In Maharashtra : दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयातून NIA ने 5 राज्यातील 19 ठिकाणी छापे टाकले आहेत.
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज देशभरात मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयातून 5 राज्यातील 19 ठिकाणी छापे टाकले आहेत. आज सकाळी जम्मू-काश्मीर, आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील 19 ठिकाणी एनआयने कारवाई केली. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) शी व्यक्तींच्या अतिरेकी संबंधांच्या प्रकरणाच्या चालू असलेल्या तपासाचा एक भाग आहे. महाराष्ट्रात अमरावती आणि भिवंडीमध्येही एनआयएने छापा टाकल्याचे वृत्त आहे. राज्यातील कारवाईमध्ये महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकदेखील आहे.
दहशतवादी संघटनांचा प्रचार आणि प्रसार रोखणे, अतिरेकी संघटनांमध्ये भारतीय युवकांना सामिल होण्यापासून रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. सध्या चौकशी सुरू असलेल्या संशयितांनी तरुणांना कट्टरतावादी बनवून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेत कसे सामिल केले, याचा तपास एनआयएकडून सुरू आहे.
अमरावतीमधून एकजण ताब्यात...
आज सकाळी एनआयएने अमरावतीमधील छायानगरमध्ये छापा मारला. एनआयएने या कारवाईत एकाला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेला तरुण हा 35 वर्षीय युवक असल्याची माहिती आहे. या तरुणाचा संबंध पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदशी असल्याचा संशय आहे. एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसकडून या तरुणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित आणखी एक छापा भिवंडीतही मारला असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
कोणत्या प्रकरणात कारवाई?
ऑक्टोबर महिन्यात एनआयएने आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरमधील 26 ठिकाणी छापेमारीची कारवाई केली होती. यामध्ये शेख सुलतान सलाहुद्दीन अयुब याला अटक करण्यात आली. या कारवाई दरम्यान एनआयएने जैश-ए-मोहम्मदशी संबंधित काही कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही साहित्य जप्त केले होते. तर, इतर काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2024 1:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NIA Raids : एनआयएची 5 राज्यांत छापेमारी, महाराष्ट्रातून काहीजण ताब्यात, दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय


