Pm Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, असा असेल दोन दिवसांच्या कार्यक्रम

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8-9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. नवी मुंबईत पंतप्रधानांचे आगमन होईल आणि नव्याने बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दुपारी 3 च्या सुमाराला ते पाहणी करतील.

News18
News18
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8-9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. नवी मुंबईत पंतप्रधानांचे आगमन होईल आणि नव्याने बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दुपारी 3 च्या सुमाराला ते पाहणी करतील. त्यानंतर दुपारी 3:30 च्या सुमारास पंतप्रधान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. तसेच मुंबईतल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
पंतप्रधान 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 च्या सुमाराला ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचे मुंबईत स्वागत करणार आहेत. दोन्ही देशांचे पंतप्रधान दुपारी 1:40 वाजता, मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटर येथे ‘सीईओ फोरम’ला उपस्थित राहतील. त्यानंतर, दुपारी 2:45 च्या सुमारास ते सहाव्या ग्लोबल फिनटेक महोत्सवात सहभागी होतील. या महोत्सवात उभय पंतप्रधानांची मुख्य भाषणेही होणार आहेत. पंतप्रधान मोदी, देशाला जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या आपल्या संकल्पानुरूप सुमारे 19,650 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत.
advertisement
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वात मोठा हरित क्षेत्र विमानतळ प्रकल्प असून सार्वजनिक-खाजगी भागीदारीअंतर्गत तो विकसित करण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई महानगर प्रदेशासाठी दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबर कार्यरत राहील. यामुळे गर्दी कमी होण्‍यास मदत मिळेल, तसेच मुंबईला जागतिक बहु-विमानतळ प्रणालींच्या श्रेणीत आणता येईल. या विमानतळाचे क्षेत्रफळ 1160 हेक्टर असून जगातील सर्वात कार्यक्षम विमानतळांपैकी एक ठरण्याच्या दृष्टीने त्याचे आरेखन करण्यात आले आहे. परिणामतः हे विमानतळ दरवर्षी 90 दशलक्ष प्रवासी (एमपीपीए) आणि 3.25 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हाताळेल.
advertisement
विमानतळाच्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधांमध्ये स्वयंचलित प्रवासी वहन (एपीएम) या परिवहन प्रणालीचा समावेश आहे. यामुळे सर्व चारही प्रवासी टर्मिनल सुरळीतरीत्या आंतर-टर्मिनल स्थानांतरणासाठी जोडली जातील तसेच विमानतळाहून शहरांकडील पायाभूत सुविधांसाठी जोडणी उपलब्ध होईल. शाश्वततेसाठी विमानतळावर शाश्वत विमान इंधनासाठी समर्पित साठवणूक सुविधा, अंदाजे 47 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती आणि संपूर्ण शहरात सार्वजनिक कनेक्टिव्हिटीसाठी ईव्ही बस सेवा असतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, हा वॉटर टॅक्सीने अर्थात जलमार्गाने जोडलेला देशातील पहिला विमानतळ ठरणार आहे.
advertisement
आचार्य अत्रे चौक ते कफ परेडपर्यंतच्या मुंबई मेट्रो मार्गिका -3च्या 2बी या टप्प्याचे उदघाटनही पंतप्रधान या दौऱ्यात करणार आहेत. या टप्प्याचा एकूण खर्च सुमारे 12,200 कोटी रुपये आहे. यासह, ते संपूर्ण मुंबई मेट्रो मार्गिका 3चे (अ‍ॅक्वा लाईन) राष्ट्रार्पण करणार असून याचा एकूण खर्च 37,270 कोटी रुपयांहून अधिक आहे. ही मेट्रो मार्गिका शहरी वाहतूक परिवर्तनातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. मुंबईची पहिली आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्गिका म्हणून हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) प्रवासाची पुनर्परिभाषा करण्यासाठी सज्ज आहे, जो लाखो रहिवाशांसाठी वेगवान, अधिक कार्यक्षम आणि आधुनिक वाहतूक उपाय प्रदान करेल.
advertisement
कफ परेड ते आरे जेव्हीएलआर पर्यंत 27 स्थानके असलेली 33.5 किमी लांबीची मुंबई मेट्रो मार्गिका -3 दररोज 13 लाख प्रवाशांना सेवा देईल. प्रकल्पाचा शेवटचा टप्पा 2 ब दक्षिण मुंबईतील वारसा आणि सांस्कृतिक स्थळांशी, जसे की फोर्ट, काळा घोडा आणि मरीन ड्राइव्हशी, अविरत आणि सुलभ जोडणी प्रदान करेल. तसेच मुंबई उच्च न्यायालय, मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई शेअर बाजार आणि नरिमन पॉइंट यासारख्या प्रमुख प्रशासकीय आणि आर्थिक केंद्रांपर्यंत थेट पोहोचणे शक्य करेल. रेल्वे, विमानतळ, इतर मेट्रो मार्गिका आणि मोनोरेल सेवा या आणि अशा वाहतुकीच्या इतर पर्यायांसोबत कार्यक्षम एकात्मितेची सुनिश्चित करता येईल अशा पध्‍दतीने मेट्रो मार्गिका-3 ची रचना केली गेली गेली आहे. यामुळे अगदी शेवटच्या टोकापर्यंतची संपर्क जोडणी वाढेल आणि संपूर्ण महानगरीय प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी होईल.
advertisement
पंतप्रधान मुंबई वन या ‘इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी ॲप’ चा प्रारंभही करतील. हे ॲप मेट्रो, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे आणि बस अशा सर्व प्रकारच्या सार्वजनिक परिवहन सेवा वापर करणा-यांसाठी असणार आहे. यामध्ये मुंबई मेट्रो मार्गिका 2A आणि 7, मुंबई मेट्रो मार्गिका 3, मुंबई मेट्रो मार्गिका 1, मुंबई मोनोरेल, नवी मुंबई मेट्रो, मुंबई उपनगरीय रेल्वे, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन, ठाणे महानगरपालिका परिवहन, मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन, कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन आणि नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेचा अंतर्भाव असणार आहे.
advertisement
मुंबई वन ॲपमुळे प्रवाशांना अनेक लाभ होतील. याअंतर्गत अनेक सार्वजनिक परिवहन सेवा पुरवठादारांच्या सेवेचे तिकीट काढता येईल, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल आणि रांगेत उभे राहण्याची गरज उरणार नाही, एकापेक्षा अधिक वाहतूक पर्यायांची गरज असलेल्या प्रवासासाठी एकाच बहुआयामी तिकिटाची उपलब्धता अशा सोयींचा समावेश आहे. या ॲपच्या माध्यमातून विलंब होत असेल तर त्याबद्दलची माहिती, पर्यायी मार्ग आणि अंदाजित आगमनाच्या वेळेबद्दल वास्तविक वेळेतील प्रवासाची माहितीही मिळू शकणार आहे. यासोबतच जवळपासची स्थानके, आकर्षक आणि महत्त्वाची ठिकाणे यांबद्दलची नकाशासह माहिती, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करण्यासाठी आपत्कालीन वा आणीबाणीच्या घटनांची पूर्वसूचना देणाची सुविधाही यात आहेत. या सर्व सोयी सुविधा एकाच ठिकाणी एकात्मिकपण उपलब्ध होणार असल्याने कार्यक्षमता आणि सुरक्षिततेत वाढ होईल, आणि संपूर्ण मुंबईतील सार्वजनिक परिवहन सेवेच्या अनुभवातही बदल घडून येतील.
पंतप्रधान महाराष्ट्रातील कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभागाचा पथदर्शी उपक्रम असलेल्या ‘स्टेप’ अर्थात अल्प - मुदतीच्या रोजगार कार्यक्रमाचे देखील उद्घाटन करतील. 400 सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि 150 सरकारी तांत्रिक उच्च विद्यालयांमध्ये या कार्यक्रमाचा प्रारंभ केला जाईल. हा कार्यक्रम रोजगारक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने कौशल्य विकासाला उद्योग जगतांच्या गरजांसोबत जोडण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल ठरणार आहे. स्टेप या कार्यक्रमाअंतर्गत 2,500 नवीन प्रशिक्षण तुकड्या सुरू केल्या जातील, यात महिलांसाठी 364 विशेष तुकड्या आणि कृत्रिम प्रज्ञा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, इलेक्ट्रिक वाहने, सौर आणि ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इत्यादीसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या 408 तुकड्या असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर 8 आणि 9 ऑक्टोबर 2025 रोजी भारताच्या भेटीवर येणार आहेत. पंतप्रधान स्टार्मरर यांचा हा पहिला अधिकृत भारत दौरा असणार आहे. या भेटीदरम्यान, दोन्ही नेते व्हिजन 2035 च्या अनुषंगाने भारत आणि ब्रिटनमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंच्या प्रगतीचा आढावा घेतील. व्हिजन 2035 हा व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, संरक्षण आणि सुरक्षा, हवामान आणि ऊर्जा, आरोग्य, शिक्षण आणि दोन्ही देशांतील नागरिकांमधील परस्पर संबंध या प्रमुख स्तंभांशी जोडलेल्या कार्यक्रम आणि उपक्रमांचा एक केंद्रित आणि 10 वर्षांचा कालबद्ध मार्गदर्शक आराखडा आहे.
भारत आणि ब्रिटनमधील सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक भागीदारीचा मध्यवर्ती स्तंभ म्हणून भविष्याच्यादृष्टीने उपलब्ध झालेल्या संधींबाबदतही दोन्ही नेते उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तिमत्वांशी संवाद साधणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये प्रादेशिक आणि महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण होईल. याशिवाय ते उद्योग क्षेत्रातील तज्ञ, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकारांशी देखील संवाद साधणार आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर, जागतिक फिनटेक महोत्सवाच्या 6 व्या आवृत्तीमध्येही पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान स्टार्मर सहभागी होणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
जागतिक फिनटेक महोत्सव 2025 च्या निमित्ताने जगभरातील नवोन्मेषकार, धोरणकर्ते, केंद्रीय बँकांचे प्रतिनिधी, नियामक, गुंतवणूकदार, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्वे एकाच ठिकाणी येणार आहे. चांगल्या जगासाठी वित्त परिसंस्थेचे सक्षमीकरण ही या महोत्सवाची संकल्पना असून. या संकल्पनेला कृत्रिम प्रज्ञा, संवर्धित बुद्धिमत्ता, नवोन्मेष आणि समावेशकतेची जोड दिली गेली आहे. या संकल्पनेतून नैतिक आणि शाश्वत आर्थिक भविष्याच्या जडणघडणीसाठी तंत्रज्ञान आणि मानवी वैचारिकतेच्या अभिसरणाचे महत्व अधोरेखित केले जाणार आहे.
यंदाच्या या महोत्सवात 75 हून अधिक देशांतील 100,000 पेक्षा जास्त जण सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. यामुळे हा महोत्सव जगातील सर्वात मोठ्या फिनटेक महोत्सवांपैकी एक ठरणार आहे. या महोत्सवात सुमारे 7,500 कंपन्या, 800 वक्ते, 400 प्रदर्शक आणि भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय दोन्ही अधिकारक्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे 70 नियामक सहभागी होणार आहेत.
याशिवाय सिंगापूरचे चलन प्राधिकरण, जर्मनीचे ड्यूश बुंडेसबँक , बँक दी फ्रान्स आणि स्विस वित्तीय बाजार पर्यवेक्षी प्राधिकरण यांसारख्या प्रसिद्ध नियामक आंतरराष्ट्रीय संस्थांही या महोत्सवात सहभागी होणार आहेत. त्यांच्या सहभागामुळे जागतिक फिनटेक महोत्सवाचे वित्तीय धोरणाविषयक संवाद आणि सहकार्यासाठी जागतिक मंच म्हणून वाढत असलेले महत्त्व अधोरेखित होणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pm Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, असा असेल दोन दिवसांच्या कार्यक्रम
Next Article
advertisement
OTT Crime Thriller: 2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
    View All
    advertisement